आह.. साझ !


Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! saaz movie
गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली!
आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या!
किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात! हा पिक्चर – १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक! खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता.
  • तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे.
  • शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये.
  • झाकीर हुसेनचे संगीत !!!!
  • झाकीर हुसेन ऍक्टर म्हणून!
एकदाचा तो टीव्ही वर दाखवला. आणि मी तेव्हा लगेचच व्हीसीआर सरसावून बसले होते, व आख्खा मुव्ही मी रेकॉर्ड केला होता.
व नंतर अगणित वेळा पाहिला.
कथा खूपच कॉम्प्लेक्स. मान्सी वृंदावन व बन्सी वृंदावन या दोघी बहिणी. त्यांचे वडिल नाव विसरले, वृंदावन (रघुविर यादव) अतिशय उत्तम गाणारे, परंतू दारूच्या व्यसनाने वाट लागलेली. लोकांकडे पैसे मागून मागून दारू पिणे इथपर्यंत व्यसन गेले. एका श्रोत्याने दारूसाठी भिक काय मागतोस म्हटल्यावर त्याने चिंब पावसात दारूच्याच नशेत पण त्वेषात म्हटलेले ”बादल घुमड बढ आये’ हे सुरेश वाडकरांच्या आवाजातले मेघमल्हारातले गाणे. अक्षरश: काटे येतात ते पाहताना. (मी ९८ साली हार्डली १५-१६ वर्षांची असेन. संगीतातले काहीही न कळता इतकं कळलं .. संगीत अफाट आहे या पिक्चरचे.) हातासारशी गाणे ऐकाच!
saaz movieमुली लहान असताना मोठीने दिदिगिरी करून पुढे पुढे केल्याचे प्रसंग आहेतच. पण मोठं झाल्यावर सुद्धा मान्सी बन्सीचे घाईघाईने लग्न लावून देते. तिला गाणं म्हणू देत नाही तसं बन्सीबरोबरच आपल्यालाही संताप येतो. बन्सी शेवटी लग्न मोडून गाण्यात करिअर करायला येते. आणि सुरू होते दोघींची स्पर्धा. रायव्हल्री. मान्सीचा इतका राग येतो ना. (अरूणा इराणी फार्र फिट्ट आहे या रोल मध्ये. अजुनही तिचा चेहरा आठवून राग येतोय मला. मस्त काम!)
शेवटी ती वेळ येतेच. जेव्हा बन्सीला मिळालेले गाणं मान्सी चोरते. (म्हणजे तिच्याऐवजी गाते) . [ असं म्हणतात ते प्रत्यक्षातले गाणं म्हणजे : ए मेरे वतन के लोगो.] तेव्हा मात्र बन्सीच्याही सहनशक्तीचा कडेलोट होतो. व एक नाते नाहीसे होते.
पुढे बन्सी संगीतकाराच्या प्रेमात पडते. [ हा आपला आर्डी असावा. ] या दोघांचे एक गाणे मला अतिशयच आवडते!! हेच ते क्या तुमने है केहे दिया.

पण इथे अजुन एक नात्यांची वीण येते. बन्सीची मुलगी कुहू(आयेशा धारकर) ही झाकीर हुसेनच्याच प्रेमात पडलेली असते. हे जेव्हा बन्सीला समजते तेव्हा ती स्वत:हून ब्रेक अप करते नाते. परंतू हा धक्का सहन न होऊन झाकीर हुसेनचा अपघात होतो. (की आत्महत्या. आठवत नाही. ) या धक्क्यातून बन्सी गाणं सोडते.
पुढे बरेच वळणं आहेत. मला नीट्शी आठवत नाहीत. पिक्चरची सीडी पण दिसली नव्हती कुठे. टॉरंट्सवर सुद्धा नाही! :(
मला काही फार कळत नाही. किंवा मी पिक्चर पाहीला तेव्हा तर काहीच कळत नव्हतं. पण असा काही सुंदर घेतलाय ना हा पिक्चर. साधा सुधा, पण तितकाच वेगळा. मला अजुनही शबानाचे सर्व कपडे देखील आठवतात.
जाऊदे.. सद्ध्या तरी ही काही गाणी ऐका अजुन.
हे श्रेय घोषालच्या आवाजतले सापडले आहे. पण देवकी पंडीतचे अर्थात सुंदर आहे!
असे हे साझ पुराण. काय बोलू अजुन. मी फार खुष आहे आज ! नुसती हीच गाणी वाजणार आता. याहू !!!!!!
अपडेट : बिगफ़्लिक्स वर आहे हा मुव्ही !! धान्ताडान.. http://broadband.bigflix.com/home/Movie/1357/Saaz

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives