१४ नोव्हेंबर, २०१६

पुस्तकं आणि मी...


मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्तकं येऊ लागली. .मग चंपक,ठकठक, किशोर मासिक,  गोट्या, चिंगी, साने गुरूजींचा सेट असं होत होत मी भयानकच वाचनकिडा झाले. मग एेतिहासिक कादंबर्यांचे दिवस आले. स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी ही पुस्कं कितीदा वाचली कोण जाणे. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मृत्युंजय वाचणे हे रिच्युअल बनुन गेले होते. (कर्णावर मेजर क्रश होता त्या काळात.. 😅) मग कधीतरी महाभारताचे सर्व खंड वाचून काढले. तेव्हाच हळूहळू बाबांच्या इंग्रजी / मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे वळले.  आमच्या घरात बाबा सतत वाचत असायचे. गम्मत म्हणजे बाबा म्हणतात आधी ते काहीच वाचायचे नाहीत पण आईमुळे वाचू लागले वगैरे. तेव्हा गम्मत वाटलेली कारण आई कधीच पुस्तक वाचताना दिसली नव्हती. पण ५०एक क्लोज नातेवाईकांची आवकजावक असलेल्या घरात, आजीचे सर्व करून तसेच ९ते ६:३० डिफेन्सची नोकरी करुन तिला वाचन वगैरे शक्यच नव्हते. (पण ती खूप आवडीने कविता करायची- करते). बाबांची मॅनेजमेंट पुस्तकं मला खूप काळ पुरली. द गोल, सेव्हन हॅबिट्स सारखी पुस्तकं मी १२वीच्या सुट्टीत वाचून काढली. अर्थात हे केवळ उदा. अशी ५०एक पुस्तकं असतील. याच काळात जी ए वाचायचा प्रयत्न केल्याचे आठवते. पण मला तेव्हा फारसे कळले नसावे.. 😬एकीकडे घरातील सर्व इंटरेस्टींग पुस्तकं वाचून झाल्याने मग मी लायब्ररी लावली. नारळीकरांच्या सायन्स फिक्शन्स, गौरी, सानिया असे वेगळेच जग समोर आले. लग्न करून अमेरिकेत आल्यावर जरा अवघड गेले. मी जरी भरपूर इंग्रजी वाचन केले असले व इथल्या लायब्रर्या अफाट मोठ्या  सुसज्ज असल्या तरी मराठी वाचन जसे होते तसे काहीच कनेक्ट होईना.. अजिबात  मराठी पुस्तकं  नसणं हे कसले सफोकेटिंग असते हे तेव्हा जामच जाणवले. ही माझी रड ऐकून मायबोली वरच्या रूनीने मला ४ पुस्तकं पाठवली. तो महिना सगळ्यात बेस्ट होता. मग हळूहळू लिस्ट करणे व दर देशवारीत पुस्तकं घेऊन येणे चालू केले.
पण गेल्या दहा वर्षात एस्पेशली इंटरनेट व सोशल मिडिया अस्तित्वात आल्यापासून वाचन मात्र कमी होत गेले आहे. नील झाल्पासून तर थांबलेच आहे. आता कळते आई कधीच बाबांइतकी वाचत बसलेली का दिसली नाही.. 😊अर्थात आम्ही मोठे झाल्यावर आईचे वाचन चालू राहिलेच तसंच माझेही होईल या आशेवर आहे मी.. पण जगात इत...की पुस्तके असताना आपलं कधी वाचुन होणार या कल्पनेने अगदी ॲन्झायटीच येते. मग फेसबुक बंद करुन एखाद्या पुस्तकाची १० पानं जरी वाचली तरी जीव जरा शांत होतो.. 😇

२ ऑगस्ट, २०१६

खेळ आणि मी

लहानपणीचे आठवतंय तेव्हापासून खेळ माझ्या आयुष्यातला आविभाज्य भाग आहे.
आमची पुण्यातील एरंडवणे भागातील पांडुरंग कॉलनी. २०-२५ सोसायट्या असलेली कॉलनी. अर्थात ७५-८०च्या दरम्यान इतक्या सोसायट्या नसणार. जेव्हा कर्वे रोड हा भाग जंगल होता, तेव्हा ह्या अशा निर्जनच भागात हळूहळू कुटुंबं जमू लागली व पांडुरंग कॉलनी वाढत गेली. त्या पहिल्या पिढीची मुलं ह्या नात्याने आमची माकडसेना प्रचंड होती तेव्हा. जिकडे तिकडे मुलंमुली.. एक माझ्या दादाच्या वयाचा गृप. तर एक माझ्या वयाचा.
माझ्या दादाच्या वयाचा गृप प्रचंड मोठा होता. माझ्यात व दादामध्ये ७ वर्षाचे अंतर असल्याने अर्थात मी लिंबूटिंबू होते त्यांच्यासाठी. त्यांच्या खेळात मी नसायचे. पण पाहायचे त्यांचे खेळ. डबाऐसपैस( biggrin ते 'द बॉय आय स्पाय यु' आहे हे नंतर कळले..) आणि अजुन काहीतरी गेम्स खेळायचे. आम्ही मात्र तेव्हा पळापळी, पकडापकडी, टिपरी पाणी खेळण्यात मग्न. कितीतरी वर्षं अन कितीतरी प्रमाणात एन्जॉय केले मी टिपरी पाणी खेळणे! माय गॉड! heehee मग हळूहळू आमच्या गृपमधील मुलं इतर खेळ खेळू लागली. आमच्या गृपातदेखील मी लहानच.(गजू-चिंटू, आदित्य, स्नेहल अन मी हा आमचा ग्रुप). गजूचिंटू हे जुळे जे माझ्याहून २ वर्षांनी मोठे होते. आदित्य व स्नेहल १,१ वर्षांनी. शिकले इतर खेळ हळूहळू.
पकडापकडीचे प्रमोशन होऊन लंगडी खेळली जाऊ लागली. तर कधी लपाछपी, विषामृत, शिरापुरी(?) जा पुढच्या घरी, दगड का माती, लोखंडपाणी, अगदीच गेलाबाजार दोरीच्या उड्या असे अफाट गेम्स आम्ही खेळायचो.. टिपी टिपी टीप टॉप, व्हिच कलर डु यु वाँट? हा ही एक खेळ आठवतोय. लपाछपी अन डबाऐसपैसला गजू-चिंटू हे ट्विन्स कायम चकवायचे आम्हाला. लपल्यावर सरळ शर्टची अदलाबदल करायचे की ओळखणारा हमखास चुकणारच! शिवाय ती दोघं अफाट दंगेखोर्/धाडसी असल्याने त्यांच्या लपायच्या जागादेखील कैच्याकैच! चिंटू एकदा मागच्या अंगणातल्या झाडाच्या अगदी शेंड्यावर जाऊन लपला होता. किती वेळ शोधत होतो आम्ही त्याला? सापडला नाहीच, पण तिथेखूप वेळ बसून बॅलन्सिंग करताना पडला तो थेट तारेच्या कुंपणावर. तळपाय अगदी चिरलाच गेला असेल. त्या दोघांसाठी रक्त ही फार मामुली गोष्ट असली तरी तो लंगडत, रक्त ठिबकत दुसर्‍या मजल्यावर जातोय हे दृश्य कितीतरी दिवस राहिले डोक्यात.
खेळणे हा प्रकार अर्थातच सीझननुसार बदलायचा. हिवाळ्यात दिवस लहान त्यामुळे संध्याकाळी लवकरच खेळ संपवायला अगदी नक्को व्हायचे! पण सगळ्याच्यां आयांच्या हाका ऐकू यायच्याच. आमच्या आईच्या तर नक्कीच!smile
पावसाळ्यात तर वेगळीच मजा! तेव्हाच्या काळी भरपूर पाऊस पडायचा! वळवाचा पाऊस आला की त्यात भिजणे हा ही खेळच! क्वचित गारा पडल्या तर त्या वेचणे (अन मुख्य म्हणजे दुसर्‍याला मारणे).. डबक्यात फतॅक फतॅक उड्या मारणे.. होड्या सोडणे. ह्याचबरोबर, भरपूर पावसाने समोरचे व मागचेही अंगण जाऊन तिथे तलाव आले की आमची रवानगी व्हायची ती गच्चीवर! मग हेच खेळ पावसात गच्चीवर खेळायचे. पावसात फुटबॉल खेळणे ह्यासारखी दुसरी मजा नाही! ह्याशिवाय अजुन एक क्रुर खेळ आम्ही खेळायचो. गच्चीच्याही उंच असे एक झाड होते उजव्या हाताला. त्याची फळं म्हणजे मिनिस्कुल वाळलेला अननस म्हणता येईल. आम्ही त्याला बहुतेक चिमणीचे घड्याळ म्हणायचो. का कोणास ठाऊक! तर ती फळं/घड्याळं/मिनिस्कुल अननस पावसात रपारप मारायचो एकमेकांना! जबरा लागायचे जोरात. असाच अजुन एक खेळ. आप्पारप्पी. टेनिसचा बॉल घेऊन चिखलातून तो एकमेकांच्या अंगावर मारण्याचा खेळ! मला एकदा इतका जोरात कानावर बसला होता बॉल.. काजवेच चमकले होते. असले खेळ म्हणजे भरपूर भांडणं, भरपूर हसाहशी.. जोडीला पाऊस! daydreaming
सगळ्यात धमाल यायची ती अर्थातच उन्हाळ्याच्या सुट्टीत! party
मी ४थीत असताना आम्ही लक्षद्वीपला गेलो होतो. अफाट सुंदर जागा! आतासारखे कसलेही कमर्शिअलायझेशन नाही. निरव शांतता, सुंदर निसर्ग.. निळंशार पाणी! पण सगळे लांबूनच पाहायचे! कारण मला पोहोताच येत नव्हते! मग आमच्या ग्रुपमधील एका आजोबांनी मला पोहायला शिकवायचे ठरवले. फ्लोटींग वगैरे कसे शिकवले मला आठवतही नाही! पण त्यांनी शिकवला बॅकस्ट्रोक. पाठीवर पडून नुसते हात पाय मारायला काय लागतेय? नजरेच्या टप्प्यात कोठेतरी एका टोकावर आजोबा आहेत हे कळत होते. पण अ‍ॅपरंटली ते मागे मागे चालत जात होते, व मी फायनली जेव्हा त्यांच्यापाशी पोहोचले तेव्हा, किनार्‍यावरची माझी आई दिसेनाशी झाली होती!! surpriseभिती वाटण्याऐवजी आपण इतकं पोहू शकलो ह्याचे मला इतके अप्रुप वाटले होते तेव्हा. इतकी एक्साईटमेंट! परत पोहत जाऊन कधी एकदा आईला सांगते असं झाले होते. त्या ट्रीपमध्ये मी भरपूरच सराव केला पोहोण्याचा!
तर सांगायचा मुद्दा हा, की त्या ४थी नंतरच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला जाणे हा माझा कार्यक्रम होऊन बसला! भल्या पहाटे ६:३० ला उठून ७च्या बॅचला चॉइस हेल्थ क्लबला जायचे. बाबा किनार्‍यावर बसायचे अन मी दणकून पोहायचे तासभर. ८ला घरी परत आले की आमचा पत्ता: हॉलची गॅलरी, झोपाळा, हातात ठकठक्,चंपक इत्यादी. ब्रेड ऑम्लेट्चा नाश्ता व वरतून बाबांनी सकाळीच करून ठेवलेला, फ्रीजमधे असलेला गारेगार मँगो मिल्क्शेक! प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीतला दिवस माझा असा उगवायचा! कितीतरी सुट्ट्या मी पोहायला जायचे. खूपच प्राविण्य मिळवले होते. पण आमचे सर आईबाबांना म्हणाले ही चांगली पोहतीय कुठ्ल्यातरी लेव्हलच्या शर्यतीत नाव घालू तेव्हापासून माझ्ह्या पोहण्यातला रस संपला. sad तेव्हा संपला असेल, पण आताही मला पोहायला फार आवडते असे लक्षात आले आहे.
एनीवे, पोहून आल्यावर मग थोड्या वेळ दोस्तमंडंळींबरोबर बाहेर खेळून आले, की जेवण झाल्यावर मात्र संध्याकाळपर्यंत बाहेर खेळायला बंदी. मग आमची उचलबांगडी व्हायची कोणाच्या तरी घरी कॅरम खेळायला. किंवा मागच्या अंगणात असलेल्या डेरेदार झाडाच्या सावलीत पत्ते खेळायला. रमी, भिकारसावकार, बदाम सात, ३०४, ५-३-२, चॅलेंज, नॉटॅठोम( rofl ) इत्यादी खेळ खेळत आरामार दुपारचे २-३ तास निघून जायचे. ह्याचाही कंटाळा आला तर कधी मोनोपॉली, व्यापार.. यंग आर्किटेक्ट, किंवा इतर काही (कोणानाकोणाच्या नातेवाईकांनी आणलेले) इम्पोर्टेड बॅटरीवर वगैरे चालणारे गेम्स, किंवा रेसिंग ट्रॅक... फारच कंटाळा आला अस्लयास कानगोष्टी वगैरे टाईपही खेळ खेळायचो, इतर बिल्डिंगमधील मुलांबरोबर. जितकी जास्त मुलं तितकं शेवटचे वाक्य मजेदार! heehee दुपारचा वेळ संपला की कसंबसं संध्याकाळचे दूध प्यायला व स्नॅक्स खायला घरी गेलो की परत संध्याकाळी खेळायला टीम हजर अंगणात. biggrin
मोठे होऊ लागलो तसे बाकीचे खेळ बंद पडत गेले. विषामृत वगैरे काय खेळायचे. ते तर लहान्मुलांचे गेम्स. आम्ही प्रचंड प्रमाणात बॅडमिंटन खेळलो. त्यानंतर फुटबॉल व क्रिकेट. मला जास्त रस बॅडमिंटनमध्येच असायचा. कितीतरी तास खेळायचो आम्ही बॅडमिंटन. तशी आमची कॉलनी बॅडमिंटनप्रेमात चायनाशी बरोबरी करेल! heeheeप्रत्येक सोसायटीतून मुलं बॅडी खेळत असायचे. त्या त्या सोसायटीचा एक भार्री प्लेयर असे. त्याच्याशी खेळताना ईर्ष्या की काय जोरात असे!
वर्षभर बरेचसे खेळ हे आपले आपले बिल्डिंगमधील मित्रमैत्रिणींबरोबरच खेळायचो. वर्षातून एकदा मात्र आख्खी कॉलनी एकत्र खेळायची. ते म्हणाजे गणेशोत्सवातील खेळ! आमच्या कॉलनीचा गणेशोत्सव हाच मुळी एक नॉस्टॅल्जिक प्रकार आहे. पण ५ दिवस गणपती बसायचे त्यातील एक दुपार मैदानी खेळांसठी असायची. त्यात अगदी चमचालिंबू, उलटे चालणे, तीन पायांची शर्यत पासून पत्ते, कॅरम्,बुद्धीबळच्या मॅचेस तसेच क्रिकेट व बॅडमिंटनच्याही मॅचेस व्हायच्या! पूर्ण कॉलनीतील मुलंच नव्हे तर मोठेही ह्यात भाग घ्यायचे. मी देखील. कॅरम वगळता, मी फायनल जिंकले आहे हे प्रसंग कमी आहेत. पण प्रत्येक वर्षी, प्रत्येक खेळात सहभाग मात्र असायचाच!!
बॅडमिंटनचा जरा विशेष उल्लेख करावा लागेल. मी वर म्हटले तसे बॅडमिंटन खेळण्यात आख्खी कॉलनीच पुढे होती आमची! कॉलनीच्या शेजारच्या गल्लीत एक कोर्ट होते, ते केवळ आमच्यामुळेच चालले असावे. एक ग्रुप माझ्या बाबांच्या वयाचा, एक गृप आईच्या वयाचा, एक ग्रुप दादाच्या वयाचा तर एक गृप माझा. कित्येक रवीवार आम्ही चौघही सकाळी बॅडमिंटन खेळायला बाहेर पडायचो! मला ते दिवस अत्यंत आवडतात! smile पुढे आईचे बॅडमिंटन बंद झाले व दादा कॉलेजात वगैरे बिझी झाला. बाबांचा तेव्हाचा बॅडमिंटनचा गृप अजुनही दर रवीवारी भेटतात. आता गेल्या ५-१० वर्षात एक एक करत सगळ्यांनी गुढघेदुखीच्या कारणाने बॅडमिंटन खेळणे बंद केले,तरी त्यांचा ग्रुप आता ब्रेकफास्टला का होईना अजुनही भेटतातच. व त्याला नावही बॅडमिंटन ग्रुप असेच आहे! smile
मी ४-५वीपासून बॅडमिंटनच्या क्लासला जाऊ लागले. तसं येत सगळंच होते, पण नुसते कोर्ट घेण्यापेक्षा एखाद्या क्लासात नाव नोंदवले की सोपे जायचे. सुरवातीला जरा लिंबूटिंबूच क्लास होता, म्हणजे जमून थोडासा वॉर्मअप मग मॅचेस खेळायच्या. पण नंतर पीवायसी जिमखान्यात जाऊ लागले. तेव्हा म्हणजे शनीवार रवीवार पडीक असायचे तिथे. गेल्यावर वॉर्मअपचे व्यायाम, मग जिमखान्याच्या मैदानाला ४-५ राउंड्स. एव्हढं झाल्यावर मग अ‍ॅक्चुअल बॅडमिंटनची रॅकेट हातात यायची. या काळात माझा खेळ अफाट सुधारला होता. मी हरायचेच नाही. इतर कोणी चांगले खेळले तर त्याला/तिला माझ्याबरोबर मॅच खेळायला मिळायची. पीवायसीला एकच वुडन कोर्ट होते तेव्हा. तिथेही सहसा खेळायला मिळायचे नाही. पण मला मिळाले. फार अफलातून काळ होता हा. इतकं जग्गात-भारी फिलिंग तसे मला कमीच वेळेला मिळाले आहे. smile
हे सगळं घरच्या फ्रंटवर होत असताना, शाळेत वगैरे मी फारशी पुढे नव्हते स्पोर्ट्सबाबतीत. कदाचित मला केवळ खेळाचा आनंद लुटायला आवडले. त्या शर्यती, आणि जिंकणे-हरणे हे कधीच आवडले नाही. विशेषतः हरणे. heehee
नाही म्हणायला स्पोर्ट्सडेला भाग घ्यायचे मी. पळणे, उड्या मारणे, डॉजबॉल इत्यादी. पण ७वी पर्यंत कधीच विशेष चमक दाखवली नाही.
७वीत मात्र धमालच झाली! मी जस्ट शाळा बदलून आले होते. (अभिनवमधून गरवारेमध्ये). फारसे कोणी ओळखत नव्हते मला. कुठून तरी व्हॉलीबॉल की थ्रोबॉलची टीम बनवायचे ठरले व कसे काय कोण जाणे माझे नाव गेले त्यात. बहुधा मी उंच होते वयाच्या मानाने. नेमाने प्रॅक्टीस सुरू झाली. मला तो खेळ आवडू लागला. खूपच मजा येऊ लागली. माझी विशेषत: सर्व्हीस फार सुंदर होत होती. रप्पाकन बॉल जायचा, तो समोरचा पकडूच शकायचा नाही. प्रॅक्टीस झाली.. त्यावर्षीचा स्पोर्ट्सडे आला. आणि आमची टिम, आमचा वर्ग जिंकत गेला. आणि आम्ही चक्क फायनलला पोचलो! आमच्या विरूद्ध टीममध्ये एक शाळेतील सर्वात अ‍ॅथलिट, कराटे चॅम्पियन वगैरे मुलगी होती. आणि चक्क मी तिला फाईट दिली! surprise माझ्या सर्व्हिसेस कोणाला कॅच करता येईनात. आख्खा वर्ग माझ्या नावाने ओरडत आहे, चीअर अप करत आहे. चुकून चूक झाली तर 'होतं असं कधी कधी चुकून चुकून' वगैरे गात आहे. हे सगळं भयंकरच नवीन होते मला. अ‍ॅड्रेनलिन रश म्हणजे काय विचारले तर मी ही मॅच सांगेन. आम्ही ती मॅच हरलोच. पण प्रचंड फाईट देऊन हरलो. हे असं पूर्वी कधीच झाले नव्हते. तो समोरचा वर्ग, दुसरी टीम कायम विनासायास जिंकत आली होती ती आज जिंकण्यासाठी तडफडत होती. त्यावर्षी प्रथमच सातवीमध्ये आमच्या वर्गाला रनर अपचे का होईना पण बक्षिस मिळाले. ते स्विकारताना जे वाटले ते सांगणे शब्दातीत आहे. daydreaming
कदाचित, माझ्या इतर बर्‍याच बाबतीत होते तसेच इथेही झाले. एकदा एखाद्या बाबतीत जरा प्राविण्य मिळवले आहे म्हटले की मी ती गोष्ट करणेच बंद करून टाकते. ७वीतल्या त्या मॅचनंतर मी फारसा कधी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला नाही. अधूनमधून बॅडमिंटन चालूच राहिले, पण इंजिनिअरिंगनंतर तेही बंद झाले. अलिकडेच मी अन नवर्‍याने इंडीयावारीतून बॅडमिंटनच्या रॅकेट्स व शटल्स आणून ठेवली आहेत. नवरा पण चॅम्पियन. त्यामुळे अधूनमधून खेळतो आम्ही. पण लहानपणची मजा और असते.
Well, तेव्हा खेळताना मजा आलीच, पण आत्ताही त्याबद्दल लिहीण्याच्या निमित्ताने आठवणींच्या प्रदेशात सैर करून आले! गतकाळाच्या ह्या आठवणी माझ्यासाठी आता विशेष महत्वाच्या आहेत. कारण गेल्यावर्षात आमची बिल्डींग पाडून रिडेव्हलपमेंट सुरू झाले. त्यात मागचे पुढचे अंगण तर गेलेच आहे, ह्या आठवणीही पुसून जायची शक्यता आहे. सृजनाच्या वाटाच्या निमित्ताने ह्या सर्व खेळांच्या फार सुंदर आठवणी मनात आल्या.. Feeling awesome.. feeling recharged!! party

१० जून, २०१६

Into the wild (चित्रपट)

Into the wild

खूप पूर्वी कुठूनतरी कानावर पडलेले हे मुव्हीचे नाव.
रूतून बसले होते अगदी.
इनटू द वाईल्ड. काहीतरी वाईल्ड नाद आहे ह्या शब्दात.

नेटफ्लिक्सवर हा मुव्ही येऊन झाले असतील ४-६ महिने. पण तो लावावासा वाटेना. कायम पुढे, नंतर कधीतरी पाहू करत ढकलत गेले. ती मोमेंट सापडेना. एखादा नाजुक हिर्‍याचा सेट घालायला तुम्ही एखादी प्रेशस वेळच निवडाल ना? तसे होत गेले. माहित नाही का, पण मला ह्या मुव्हीच्या नावापासूनच खात्री होती की हा डायमंड सेट आहे. उगीच जेवता जेवता लावून ठेवायचा मुव्ही नाही.

एक दुपार सापडली. सापडली म्हणजे शोधत नव्हतेच तिला. त्या दुपारच्या निवांत वेळेने मला गाठले. अन कोणत्यातरी अनामिक ओढीने मी इनटू द वाईल्ड सुरू केला.
लॉर्ड बायरनचे शब्द स्क्रीनवर आले, अन अक्षरशः पॉझ करून बसले एक मिनिट. परत एकदा वाचले नीट, मोठ्यांदा उच्चारले ते शब्द..

There is a pleasure in the pathless woods,
There is a rapture on the lonely shore,
There is society, where none intrudes,
By the deep sea, and music in its roar:
I love not man the less, but Nature more.

आणि सुरू झाला प्रवास, Into the wild..

Christopher McCandless ह्या मनस्वी तरूणाचा हा प्रवास लिखाणातून मांडणे कसे शक्य आहे? वेल, अगदीच ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी- ख्रिस, एक २२-२३ वर्षाचा मुलगा, अ‍ॅटलांटातील एका ख्यातनाम युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट होतो. पुढे हार्वर्डमधून लॉ करायचे आहे वगैरे आईबाबांना सांगतो. आणि आपल्याकडील सर्व मालमत्ता, पैसा, सर्व काही डोनेट करून गायब होतो. गायब कुठे होतो? तर तो निघतो भ्रमंतीला. आपल्या जुन्या कारमधून जातो जातो, फ्लॅश फ्लडमध्ये खराब झाल्यावर कार तशीच बेवारस सोडून देतो.. पैसे जाळतो.. चालत सुटतो.. नदीतून कनूइंग करत फिरतो.. रस्त्यावरच्या हिप्पीजना भेटतो.. त्यांच्याबरोबर समुद्रावर राहतो, गव्हाच्या शेतात काम करतो.. पुढील प्रवासाला लागेल इतपत पैसा मिळेल असेल लोइन्कम जॉब्स करतो.. भरपूर पुस्तके वाचत राहतो, लिहीत राहतो.. मोठ्या मोठ्या लेखकांचे शब्द/कोटस लोकांना ऐकवून दाखवतो..  कधी अकस्मात निघून जातो..  अर्थात तो त्याचे नाव ख्रिस नाही सांगत. अलेक्झांडर सुपरट्रॅम्प. फॅमिली? डोन्ट हॅव एनीमोअर. जो भेटेल त्याला ख्रिस आवडतो. ख्रिसला? त्याला तसं काही पडलेलं नसतं. त्याचे ध्येय एकच.. अलास्काला जाणे.

इतक्या एक्स्ट्रीम ठिकाणी राहायचा, हायकिंग करायचा अनुभव नसताना ख्रिस हे धाडस का करू पाहात आहे? हा निव्वळ वेडेपणा आहे का? मी एके ठिकाणी वाचले तसा, हा youthful innocence आहे की arrogant ignorance?
मुव्हीमध्ये खूप अंधुक असे रेफरन्सेस येतात, ख्रिसच्या आईबाबांच्या डॉमेस्टिक अ‍ॅब्युझ असलेल्या नात्याबद्दल, बाबांच्या अती डॉमिनेट करण्याच्या स्वभावाबद्दल, मटेरिअलिस्टीक - वस्तूंच्याच प्रेमात असल्याबद्दल... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणाजे वडिलांच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल - जे अजुनही टिकून आहे अशा. ह्या सर्वात संवेदनशील असलेला ख्रिस करपून निघतो. आपल्या पालकांबरोबरच्या ह्या आयुष्याला तो नाकारतो. पुढे वेनबरोबर पबमध्ये बसून जोरजोरात त्वेषाने केवळ 'सोसायटी', 'सोसायटी'... 'सो...सायटी' असे शिव्यांच्या आविर्भावात ओरडतो - नंतर कधीतरी म्हणतो, करीअर - हे तर २०व्या शतकातले फॅड आहे! - तेव्हा दिसते ती केवळ त्याला हवी असणारी ऑर्गॅनिक लाईफस्टाईल. स्वच्छंद आयुष्य - ज्यात पैसा, महागडे कपडे, गाड्या, डिग्र्या ह्यांचा अडसर नसून केवळ तुम्ही व निसर्ग आहात!ख्रिस पुढे खरंच अलास्काला जातो. भर थंडीत! जिकडे तिकडे पांढरे बर्फाचे साम्राज्य असलेल्या अलास्कातील देनाली नॅशनल पार्कमध्ये. बरोबर केवळ एक हायकिंगची बॅगपॅक. असेच कोणीकोणी दिलेले काही उपयोगी पडेल असे सामान. जंगलातील कोणते झाडे व हर्ब्स खावीत्,न खावीत हे सांगणारे पुस्तक, १० पाउंड तांदूळ व डायरी अन पेन.

सोपं असेल असं राहणे? कितीही आईबाबांवर संतापून, त्या आयुष्याला वैतागून फिरतीवर निघाला असला तरी रोजच्या दिवसातील संकटं त्यानेच फेस केली. फळं, बेरीज खाऊन भूक भागवली.. हळूहळू शिकार करू लागला. मांस कसं टिकवायचे, शिजवायचे हे शिकला. आहे त्या परिस्थितीत टिकून राहणे, मार्गक्रमण करणे हे किती धैर्याचे काम आहे?मी मुव्हीबद्दल काहीच न वाचल्याने, अगदी ही सत्यघटना आहे हेही मला काहीच माहित नसल्याने मुव्ही रूतून बसला खोल. आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला हा मुव्ही पाहून पण ख्रिस मध्येच समोर येतो. मला कणखर बनायला शिकवतो. परिस्थिती कितीही खराब असली तरी यु हॅव टू फील दॅट यु आर स्ट्राँग हे बजावतो. हॅपीनेस हा वस्तूंमध्ये नाही तर आजूबाजूला पसरला आहे हे शिकवतो. तो खूप फँटसीत रमणारा आहे का? सोसायटीला असं कोणी कसं फेकून देऊ शकतो? मी तर नाही करू शकणार असे. मुव्हीच्या कित्येक परीक्षणातून इतर लोकांनी लिहीले आहे, डॉमेस्टिक अ‍ॅब्युझ काय असतो माहित आहे का त्याला? त्याच्यातून पळून जाणं हे हिरोइक नसून त्या तसल्या परिस्थितीतही राहून राईज होणे हे हिरोईक आहे... इत्यादी. मला तसं नाही वाटले. ख्रिस मला पळपुटा नाही वाटला. त्याला त्याचे व्यक्तीमत्व आहे, त्याला तसे जगायचे होते म्हणून तो असा फिरला. त्याला त्याच्या पालकांचे आयुष्य अगदीच नकोसे झाले, पण जिथे जाईल तिथे त्याने स्वतःची फॅमिलीच तयार केली. ज्याला ज्याला भेटला, त्याला त्याला ख्रिस आपला वाटला, जवळचा वाटला.. इतका की तो निघाला की अगदी ओक्साबोक्शी रडू येईल इतपत जवळचा!

पूर्ण सिनेमात ख्रिस मला बर्‍यापैकी अलिप्त वाटला, परंतू मुव्ही संपता संपता ख्रिसलाही समजतेच की.. हॅपीनेस इज ओन्ली रिअल, व्हेन शेअर्ड!६ जून, २०१६

काय बोलत असतील ती दोघं?

आज बाहेरची कामं आटोपून घरी येताना सिग्नलला थांबले होते. सहज बसस्टॉपकडे नजर गेली तर एक वेगळंच दृश्य दिसले. इकडे लॉस एंजिलीसमध्ये बसस्टॉपपाशी खूप होमलेस लोकं दिसतात. (आय मिन एकाच स्टॉपपाशी खूप लोकं नव्हे. जनरल पूर्वीच्या गावापेक्षा इकडे होमलेस जास्त दिसतात. एखाद्या स्टॉपवर, डिव्हायडरवर एखाद-दुसराच माणूस असतो..) जवळच एखादी बेवारशी शॉपिंग कार्ट, त्यात अठरापगड गोष्टी असतात. कोणीतरी एखादे गरम जॅकेट वा कम्फर्टर दिले असते ते घेऊन तो माणूस बसलेला असतो.. क्वचित स्त्रियाही असतात. इथे एक वेगळंच आहे. आपण भारतात असताना सरसकट रस्त्यावरच्या लोकांना भिकारी म्हणतो. इथे तसे होत नाही. इथे होमलेस म्हणतात. होमलेस लोकं पुअर, जॉबलेसही असू शकतात पण क्वचित कधी त्यांना व्यवस्थित नोकर्‍याही असू शकतात. राहायला मात्र जागा नसते. माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या जवळच्या बसस्टॉपपाशी राहणारा माणूस मी जाते त्याच ग्रोसरी स्टोअरमध्ये शॉपिंग करतो. आय मिन एखादेच काहीतरी कॅन्ड फुड वगैरे. पण तोही दिसतो मला तिथे..
एनीवे.. तर हा होमलेस माणूस, जुनेच पण एकंदरीत परिस्थितीशी फटकून असलेले सोनेरी बटणांचे क्वॉड्राय जॅकेट घालून, डोक्यावर हॅट घालून बसला होता. आणि त्याच्याशेजारी एक बर्‍यापैकी सुस्थितीत असलेली एक स्त्री, अतिशय कळकळीने काहीतरी त्याला सांगत होती. नमाज पढताना कसे दोन्ही हात पुढे येतात तसे करून, अगदी भरपूर बोलत होती. तोही काही शांतपणे बोलत होता, कधी नाही नाही म्हणत होता. त्यांच्या मध्ये एक राल्फ्स ह्या इकडच्या ग्रोसरी स्टोअरची पिशवी होती. हे सर्व रस्त्याच्या पलिकडच्या बाजूच्या बसस्टॉपवर चालू असल्याने मला केवळ दृश्य दिसत होते. ऐकू काहीच येत नव्हते.
मला इतकी उत्सुकता दाटून आली काय त्यांचे संभाषण चालू असेल? जनरली आपण अशा माणसांशी कशाला बोलायला जाऊ? मी तर जात नाही. उगाचच भिती वाटते मला. (काही लोकं, स्पेशली स्त्रिया, एकटं राहून, रस्त्यावर राहून थोड्या विमनस्क अवस्थेत बडबड, आरडओरडा करत असतात. त्यामुळे मी अगदी त्यांना काही हेल्पही करायला जात नाही, की त्यांच्याकडे बघतही नाही.. मीच असे नाही, बहुतांश लोकं असंच वागतात. क्वचित कोणी बनाना, काही बार्स वगैरे खायला देतात.. कधी पैसे देतात..) ह्या पार्श्वभूमीवर हे दृश्य फारच वेगळे वाटले. काय बोलत असतील ती दोघं? तुमचा काही गेस?

२९ मे, २०१६

व्हर्चुअल की रिअल?

भारतात असताना माझ्या बाबांबरोबर खूप वेळा ह्या विषयावर चर्चा झाली. एका मैत्रीण मैफिलीला देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
मैत्रीणवर/व्हर्चुअल माध्यमातून होणारी मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्री ह्यात काय फरक जाणवतो? किंवा मैत्रीणवर रोज भेटता तेव्हा एखाद्याची प्रतिमा तयार होते व प्रत्यक्ष भेटल्यावर काही फरक जाणवतो का? दोन्ही पद्धतींमधील तुम्हाला कोणती पद्धत जास्त भावते?

माझ्याबाबतीत विचाराल तर मी व्हर्चुअल जगात जास्त मोकळेपणे वावरते. प्रत्यक्षात मला सोशल अँझायटी असावी इतपत मी शांत असते. हे माझ्या बाबांना बर्‍यापैकी डाचत आले आहे. पूर्वी मलाही असं वाटून जायचे की आपलं सगळंच ऑनलाईन असते. straight face
एनीवे.. माझ्या आईबाबांच्या घरी झालेल्या मैफिलीत हा विषय निघाला चहाच्या वेळेस. कोणी कोणी बिनसाखरेचा चहा प्रिफर करतं, कोणी नव्याने घेत होते. पण मी मात्र बिनसाखरेचा घेणे शक्यच नव्हते! मी का अजून कोणीतरी बोलून गेले.. "हो! त्या अमुकला पण २ चमचे साखर लागते ना चहात!?" heehee
दॅट वॉज द युरेका मोमेंट! तिथल्या मुलींपैकी  कोणीच भेटले नव्हते तिला .  पण आम्हा सर्वांना तिचा चहा कसा असतो हे माहित. मैत्रीणवर येऊन रोजच्या रोज विविध विषयांवर गप्पा होतात, त्यात प्रत्येकीची मतं उमगत जातात. व्यक्तीपरिचय वाढत जातो.
शिवाय विविध विषयांवरील गप्पांमधून आपली कोणाशी वेव्हलेंथ जुळेल हे ही समजत जाते. प्रत्यक्षात ही प्रोसेस किती अवघड असते? रोजच्या धबडग्यातून गप्पांना वेळ मिळेलच असे नाही, हाय हॅलोच्या पुढे गप्पा होतीलच असे नाही. झाल्या तरी, प्रत्येक परीचिताबरोबर भरपूर गप्पा मारल्यावरच समजणार मतं. त्यातून समजेल आपलं जुळेल की नाही.
मैत्रीण काय किंवा इतर अशा वेबसाईट्सवर जुळलेली मतं, जुळलेले मैत्र हे जास्त प्रेशस वाटते मला! इन्स्टंट व त्याचबरोबर क्वालिटी असलेली मैत्री!
अजुन एक प्रकार होतो, तो म्हणजे व्हर्चुअल जगातील प्रतिमा व प्रत्यक्षातील ह्यात फारकत असणे. असं होतही असेल, मी तरी अजुन अनुभवले नाही.
एकुणात काय, माझ्या आईबाबांच्या पिढीला ही व्हर्चुअल मैत्री पचनी पडणे अवघड वाटत असेल खरी, पण मला तरी प्रचंड आवडते! (अर्थात माझ्या आईबाबांना मैत्रीण.कॉमबद्दल कौतुक आहेच! हेच त्यांना समजत नाही की आपली बर्‍यापैकी माणुसघाणी मुलगी देशात आल्याआल्या नेक्स्ट विकेंडला ४०-४५ मुलींना भेटते म्हणजे काय?! कल्पनेपलिकडचे आहे हे सर्व! biggrin म्हणूनच त्यांना इतके प्रश्न पडत होते.. ) हेच सेम, फ्लाईटचे चेकइन ५ तासात असताना झालेली ठाणे मैफिल. एरवीची मी अशी वागणेच शक्य नाहीये! इतका त्रास कोण घेईल?  मैत्रीण.कॉमच्या मैत्रिणी भेटणार ही ओढ खरंच वेगळी आहे. इथे मैत्रीण माझी वेबसाईट आहे म्हणून असेल असं मला वाटत नाही. मैत्रीणची नुसती सदस्या असते तरी कदाचित असंच वाटले असते.

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...