एक भन्नाट दुपार !

शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ.
जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं! बाहेर पडलो, ते मालिबूच्या उलट्याच दिशेला! सॅन्टा बार्बराला.. दोन्ही लाडक्याच जागा! ही काय नाहीतर ती काय..
१०१ वर प्रचंड ऊन व झळा बसत होत्या. वाटलं हे अवघड होणार आहे. इतक्या उन्हाचे बाहेर पडणे आजकाल नकोच वाटते. असं मनात म्हणतीय तोवर गाडीने व्हेन्च्युरा मागे टाकले व त्याच वेळेस ढगांनी सूर्याला ! जसा जसा डोंगराचा चढा रस्ता आला तसा डावीकडे समुद्र दिसू लागला.
अरे पण हे काय ! असे दृश्य मी खरंच कधी पाहीले नाही.
नावाला जागणारा संथ प्रशांत महासागर, ढगा दाटून आल्याने सूर्यदेव व उजेड तात्पुरत्या ब्रेक वर गेलेले, जितके ढग आभाळात त्याहून जास्त खाली समुद्रावर उतरलेले. व त्या सर्व वातावरण निर्मितीमुळे समुद्र चक्क उभा दिसत होता. म्हणजे कळलं ना? समुद्र म्हटल्यावर कशी दूरवर एक क्षितीजाची ओळ दिसते, तसली काहीच भानगड नाही. समुद्राचे पाणी व आकाशातले ढग सगळे मिसळून गेलेले. त्यामुळे ही जमिन आहे की आकाश आहे? समुद्राचे पाणी आहे की ढग आहे काही कळेनासे झालेले..
हळूहळू आमच्या आवडत्या ‘एमा वुड स्टेट बीच’ पाशी गाडी जावू लागली तशी नेहेमीची RVची गर्दी दिसू लागली. आम्हीही मग आमचा खाऊचा डबा काढला व बीचवर एका खडकावर बसून वातावरणाचा आस्वाद घेऊ लागलो. इतकी सुंदर हवा होती ! अगदी ५-७ मिनिटांपूर्वीच उन्हाच्या झळांनी मी वैतागले होते हे खरे सुद्धा वाटणार नाही, अशी!
आमच्या पाठीमागेच मोठ्ठाल्ला डोंगर ढगांची दुलई पांघरून बसलेला.
व पुढे उधाण आलेला समुद्र !
मग मी ही थोडंफार फोटोसेशन करायचा प्रयत्न करू लागले. पण मला अजुनही ढगाळ हवेत छान क्लिअर फोटो काढता येत नाहीत. मग ते पिकासावर कॉन्ट्रॅस्ट सांभाळा वगैरे करावे लागते. पण तरी काढले.



तेव्हढ्यात निनाद ओरडला, ” ए तिकडे बघ समोर, पाण्यात !! ”
“काय आहे??”
“अगं मासे दिसतायत.. ”
“नाहीरे, ही सर्फिंग करणारी लोकं असले कपडे घालतात की ते मासेच वाटतात.. सोड.. ”
“बघशील का जरा??”
“ओके.. बघुया.. ”
आणि मला चक्क पाण्यातून एक त्रिकोण वर आलेला दिसला.. शार्क?? :अओ: इतक्या जवळ?? आणि ही लोकं काय आरामात पोहत आहेत!!




थोडं नीट पाहील्यावर (आणि अर्थातच थोडा कॉमन सेन्स लावल्यावर ) कळले की ते डॉल्फिन्स होते !! 


ऐकले होते, पाहीलेही होते, पण डॉल्फिन्स इतके माणसाळलेले किंवा फ्रेंडली असतील याची काहीच कल्पना नव्हती! इतके मस्त पोहत होते.. लाट आली मोठी, की तिच्यावर सवार होऊन धिंगाणा करत होते !


ही बाई दिसतीय ना? तिच्या समोरच जवळपास ६-७ डॉल्फिन्सचा मित्रगण एकत्र पोहत होता. इतकी धमाल करत होते ना ते, की नुसते बघत राहावेसे वाटत होते. सगळे एकामागून एक डुबकी मारायचे पाण्यात.. आणि मग मोठी लाट आली की परत तिच्याबरोबर पोहायचा खेळ! फार हेवा वाटला त्यांचा! त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने पोहाणार्‍या या लोकांचाही! आम्ही काही पोहाण्याच्या इराद्याने आलो नव्हतो, नाहीतर आम्हालाही धमाल करता आली असती..



हळूहळू सगळे डॉल्फिन्स पोहत पोहत आमच्या डाव्या हाताला लांबवर गेले. मग काय आमचा तिथला इंटरेस्टच संपला! नेहेमी त्या जागेवर पिक्चरचा हिरो असतो समुद्र, डोंगर .. मात्र आज हिरो होते डॉल्फिन्स! ते निघून गेल्यावर बाकीचे साईडी हिरोज, अन डिरेक्टर्स कशाला पाहायचे! (तसंही ते हज्जारदा पाहीलेय.. इव्हन लोकांनाही ही जागा माहित झाली असेल एव्हाना.. :फिदी: )


तिथून निघालो, तर विनोदाच्या बीबीवर शोभेलशी पाटी दिसली. लगेच फोटो काढला! (काय हे मायबोली व्यसन!)




मग रस्त्याला लागतोय न लागतोय तेव्हढ्यात ही हिरॉईन आली! झुकझुकगाडी !!

अ‍ॅमट्रॅकची ही सर्फलाईनर मस्तपैकी समुद्रकिनार्‍याशेजारून , डोंगराच्या पायथ्यापासून झुक झुक करत जाते. अगदी रमत गमत .. जणू काही आतल्या प्रवाशांना अभिमानाने तिच्या आसपासचा परिसर दाखवत , त्यांना त्या जागेचा पूर्णपणे मझा लूटता येईल अशी जाते..






गंमत म्हणजे आमच्या गाडीत तेव्हाच ते ‘रब ने बनादि जोडी’ मधले ‘फिर मिलेंगे चलते चलते’ गाणं लागलं!! :फिदी: आणि निनादला तर अगदी राजेश खन्ना झाल्यासारखेच वाटू लागले !! मग त्याला ‘तेरे सपनोंकी रानी’ इथ्थेच गाडीमध्ये आहे हे सांगून जरा (ट्रेनमधून) जमिनीवर आणले.. :फिदी:
अशा सुपर्ब हवेचा आनंद घेत , फोटो काढत आम्ही निघालो सॅन्ता बार्बराच्या दिशेने..
लँड ऑफ ब्युटी !! दुसरा शब्दच नाही ..
नेहेमीसारखे बीचवर न जाता आम्ही गेलो ‘स्टेट स्ट्रीट’ला. अमेरिकेतील सर्वात सुंदर डाऊनटाऊन समजल्या जाणार्‍या ठिकाणी. या रस्त्यावर येऊन कॅमेरा काढायची सुद्धा शुद्ध कधीच न राहील्याने इथले फोटोज माझ्याकडे नाहीतच.
(हा एक नेटवरचा फोटो बघा या जागेचा.. )
स्टेट स्ट्रिटवर मनसोक्त फिरलो ! शॉपिंगचे खूप पर्याय आहेतच इथे. पण यावेळेस तर मला खूप इंडियन वस्तू,कपडे,नक्षीदार दागिने,स्कार्व्हज, साड्या विकणारी दुकानं दिसली.. रस्त्यावर आर्टिस्ट आपली कला सादर करत होते. एक माणूस तर ड्रमवर इतके अफाट सुंदर अफ्रिकन बीट असलेले म्युझिक वाजवत होता की सगळी लोकं तिथेच रेंगाळत होती! एक आजोबा व्हायोलिनवर अतिशय आर्त म्युझिक वाजवत होते..
असा माहौल बनतो ना इथे! पाय निघतच नाही.. असं सगळं भरपूर हुंदडल्यावर अर्थातच भूक लागली. तेथील गलंगा थाई रेस्टॉरंट मध्ये आयुष्यातील सुंदर थाई फुड खाऊन तृप्त मनाने व पोटाने घराच्या दिशेने निघालो..
डॉल्फिन्स, ही हवा, स्टेट स्ट्रिट.. सगळ्याची धुंदी चढली होती अगदी !
अज्जिबात विसरणार नाही मी, अशी ही एक दुपार-संध्याकाळ !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!