अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी – कॅपिटॉल हिल ..

एअर अँड स्पेस म्युझियममधून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन थांबलो. या भागातून एक हॉप ऑन हॉप ऑफ बस टूर फिरत असते. म्हणजे कुठेही बसा, कुठेही उतरा. तिच्या स्टॉपला आम्ही थांबलो. कारण आता वेळ कमी पडत चालला होता! टूरचे ५६ डॉलर्स जास्त वाटले खरं, पण पायांवर तेव्हढा विश्वास बसत नव्हता! त्यामुळे थांब थांब थांबलो.. एकदाची बस आली.. सरळ आत जाऊन बसायच्या ऐवजी आम्ही त्या गाईडला विचारले की भाऊ कशी जातीय ही बस? तर नेमकं त्यांचे व्हाईट हाऊस पाहून झाले होते.. आम्हाला तर ते पाहायचेच होते! मग आम्ही त्यालाच विचारले, बाबारे कसे जाऊ आम्ही? आजचेच ३-४ तास आहेत आमच्याकडे.. सगळं शक्यतो बघायचे आहेच. त्यानेच सांगितले, मेट्रोने फिरा. जास्त स्वस्त जाईल. या टूरमधे पैसे खूप जातील व व्हाईट हाऊस नाहीच!
उतरलो, आणि कॅपिटॉल हिलला चालत निघालो. कारण त्याच्या स्टेशनवर मेट्रोने जायला जवळपास तेव्हढीच पायपीट करावी लागली असती. मग निघालो चालतच. पायांवर विश्वास ठेवावाच लागला…
चालतोय, चालतोय… यायलाच तयार नाही! मग आम्ही वाटेत येतील ती म्युझियम्स बघायचा(?) सपाटा लावला! तेव्हढीच सावली मिळायची, रेस्टरूम्सला जाऊन फ्रेश होता यायचे, पाणी बिणी पिऊन – येता जाता जितके दिसेल तितके म्युझियम पाहायचे व प्रवास चालू! :) अशा प्रकारे आम्ही अमेरिकन-इंडीयन म्युझियम पाहीले, म्युझियम ऑफ स्टॅच्युज पाहीले, अजुन बरंच काही! मजाच होती ती !! :D
अमेरिकन इंडियन्सचे शूज !


गार्डन ऑफ स्टॅच्यूज !


शेवटी एकदाचे आले ते… कॅपिटॉल हिल !! (काश… द लॉस्ट सिम्बॉल महीनाभर आधी येते.. काय काय हिस्टरी जॉग्रॉफी कळ्लीय ना आता त्याला तोडच नाही! ती नंतर कधीतरी! ) मला आता असं वाटतंय मला काही धड माहीती होती का तरी तेव्हा?? या ट्रिपला जायच्या आधी मी खूप खूप ठरवलं होतं, सगळं नीट वाचायचे आणि मग जायचे फिरायला. पण वेळ मिळाला नाही आणि तेव्हढा इंटरेस्टही वाटला नाही, आणि तशीच आले तिथे. :) गंमत म्हणजे तिथे जायचे व बाहेरून, कॅपिटॉल हिलच्या पार्श्वभूमीवर फोटो घ्यायचा आणि निघायचे!! एव्ढाच कार्यक्रम.. त्यासाठी इतके अंतर (अक्षरश:) तुडवत गेलो..




त्याच्याचसमोर जनरल Ulysses S. Grant याचा पुतळा झळकतो! अतिशय रूबाबदार पुतळा आहे हा..चौथर्‍यावर हा घोड्यावर बसलाय, आणि चारी बाजूला (स्थितप्रज्ञ !) सिंह !





काय ना .. एकेका वास्तूच्या नशिबी ग्लॅमर असते. तसेच ते इथेही होते! आत कसे असेल? तो वरचा टोकाचा पुतळा कोणाचा आहे? असे बरेच प्रश्न आले खरे..पण निरूत्तरीतच राहीले.. त्या हिलच्यास्मोरच्या लॉनवर लांबवर ऑर्केस्ट्रा अर्र .. आमच्या तोंडी शब्द सुद्धा मध्यमवर्गिय येणार! ऑर्केस्ट्रा नाही, म्युझिक कॉन्सर्ट चालू होती… व्हायोलिन वाल्यांचा जथ्था, गिटारवाल्यांचा वेगळा वगैरे… म्युझिक तर मजाच झाली.. आम्ही तिथे गेलो तर , “ये चांद खिला , ये रात हसीन …..लालालालललालाला…. ना समझे वो अनाडी है” या गाण्यासारखी सेम ट्युन वाजत होती!! हेहे… आम्ही आपलं हेच गाणं म्हणत बसलो मग.. :)


आता पुढ्यात फार मोठी कामगिरी होती!
  1. कॅपिटॉल हिलचे मेट्रो स्टेशन शोधायचे,
  2. त्या मेट्रोने जाऊन स्मिथसॉनियनला उतरायचे,
  3. तिथून पुढे वॉशिंग्टन मॉन्युमेंटला .. परत चालत ! :(
मॅप सरसावला आणि निघालो. सकाळीच मामाला जीपीएस आणि गुगल मॅपच्या जगात कागदी मॅप्स काय वापरतोस म्हटले होते! पण शेवटी इथे कागदी मॅप्सच उपयोगी पडले. मेट्रो स्टेशन ’कागदावर’ शोधणे फार्फार सोप्पे होते! पण चालत, डिरेक्षन्स पाहात, माझ्या शंकांनी भरलेल्या दृष्टीकोनाला बरोबर घेऊन, गोळे आलेले पाय फरपटत ओढत ते स्टेशन सापडणे फार अवघड होते! मी एकटी असते तर मी परत घरी निघून गेले असते एव्हढं नक्की! जाम वैतागले उन्हाला आणि चालण्याला.. पण निनादने शोधलं देवदयेने ते.. आणि स्टेशनवर – जमिनीखाली गुडूप होऊन बसलो.. :) एकतर भूयार असल्याने इतके गार्गार वाटले,सावली मिळाली, बसायला बाकडं मिळालं.. हे म्हणजे छप्पर फाडकेच झाले अगदी! तापलेला जीव निमाला एकदाचा..
५-७ मिनिटातच मेट्रो आली. बसलो बसलो म्हणेस्तोवर उतरलो देखील.. जमीनी’वर’ आल्यावर दिसले “चालायचे अंतर” ! नक्को वाटत होते ! तरी चालू केली परत घोडदौड.. पाणी पीत , पीत एकदाचे मॉन्युमेंटच्या एरियामधे आलो ! पण इतके… दमलो की समोरच्या लॉनवर अंग आदळून बसकणच मारली ! लॉनच्या समोर होते स्टेज.. आणि तिथे एक माणूस मनोरंजन करायला उभा होता.. गिटार घेऊन गाणी म्हणत होता.. लोकं समोर आराम करायला बसली आहेत व एकाचेही आपल्या गाण्याकडे लक्ष नाहीये हे माहीत असूनही त्याची गाण्याची विजिगिषू वृत्ती वाखाणण्याजोगी होती!! :D आमच्या समोर दोन बायका कमरेला फिरवायची रिंग घेऊन सो कॉल्ड डान्स करत बसल्या होत्या त्या म्युझिकवर! नाही म्हाणायला दोन कुत्री त्या सिंगरकडे पाहात होती! :)





आता खरेतर मॉन्युमेंट अगदी आमच्या पाठीमागे होते. पण तेव्हढेही फोटो काढायचे त्राण नाही राहीले.. शेवटी आम्ही तिथेच बसलो ५मिनिटे.. आराम केला.. पाणी पिऊन घेतले .. गार हवा घेतली जेव्हढी येइल तेव्हढी आणि मग उठलो… आता जवळ जवळ ४.३० वाजत आले होते .. आधीच्या प्लॅननुसार आमचं आत्तापर्यंत बघून आटोपायला हवे होते. पण अगदी मेन-मेन गोष्टी म्हटलं तरी मॉन्युमेंट आणि व्हाईट हाऊस बाकी होते. मामाला फोन करून सांगितले उशीर होईल. आणि निघालो मॉन्युमेंटकडे.
पुढच्या भागात बघुया मॉन्युमेंट, व्हाईट हाऊस आणि तिथला एक सुखद धक्का !! :)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives