२८ मे, २००९

१,२,३.. टेस्टींग.. टेस्टींग !!

ह्म्म.. सद्ध्या माझ्याकडे अफाट रिकामा वेळ आहे, हे तुम्हाला कळतच असेल.. माझ्या मे महीन्यातल्या (टाईमपास )पोस्टच्या संख्येवरून! senyum

किती घोळ घालतीय आजकाल मी ब्लॉगमधे! बापरे!
रोज एक तरी कोड टाकतेच आहे.. स्लो झाली असणारे साईट..

 • टेम्प्लेट बदललं.. आधीचे फार छान होते! पण फार क्लटर्ड वाटले.. आणि मुख्य म्हणजे मला सांभाळणे मुश्किल झाले होते ते! ऍक्चुअल पोस्ट बॉडी मधे काहीच कोडींग करता येईना! Duh.. याला काय अर्थ?? मग दिले फेकून! हे क्युट, सिंपल साधं सोप्पंच बरं.. (निदान काही दिवस तरी!kenyit )
 • अरे हो, स्मायलीज नोटीस केल्या का कोणी? menari आधीच्या जरा डेंजरच वाटत होत्या.. या याहूच्याच चांगल्या! शिवाय, कमेंट्स मधेही एनेबल्ड केल्या आहेत.. हसा लेको! sengihnampakgigi कमेंट फॉर्मही एम्बेडेड केला..
 • Save as PDF , Button मी काढून टाकले परत.. ते काही काम होईना.. आणि तसंही कोण आवर्जून सेव्ह करून ठेवणार??
 • RSS Feeds चा Icon बदलला.. हा हत्ती जास्त क्युट आहे! sengihnampakgigi
 • प्रत्येक पोस्टखाली रिलेटेड पोस्टचे विजेट टाकले.. वाचकांना जरा जास्त वेळ गुंतवून ठेवायला ते बरं असतं! kenyit
 • नंबर्ड पेजिनेशन - नंबर्ड पेज नेव्हीगेशन चालू केले.. होम पेजच्या पुढच्या(की मागच्या!) पेजवर ते दिसेल..
 • सर्वात महत्वाच्या २ गोष्टी ! या टेम्प्लेटमधे नसणारा नेव्हीगेशन मेनू बार मी तयार केला! अर्थात बेसिक कोड ढापल्याशिवाय कसं काम होईल? पण सगळा नट्टापट्टा, टेम्प्लेटला साजेसे कलर्स(हे अवघड काम! हेक्स कलर कोड्स शोधून मरून कुठला वगैरे ओळखायचे! around)फॉन्ट्स, मेन्यू बार साईझ.. सर्व! :) आणि दुसरी गोष्ट , ही खालची सिग्नेचर!
ही पोस्ट केवळ अन केवळ टेस्टींग साठी.. senyum

आवडला नविन ब्लॉग??? मला खूप्पच!

२६ मे, २००९

Zoo Zoo..!

तुम्ही जर zoozoos च्या शोधात आला असाल इथे, तर कसं फसवलं!! :D हेहे.. ते झूझूज क्युट आहेतच! पण मी लिहीतीय़ ते नुस्त्याच झू बद्दल! Los angeles Zoo.. !

परवा होता लॉंग विकेंड.. कुठेतरी लांब जायची इच्छा होती, पण ती काही वर्काउट नाही झाली! शेवटी काहीच नाही तर निदान एले झू पाहावे म्हणून निघालो..
तिथे पोचल्यावर कळले की अशा विचाराने आख्खी जनता लोटलीय तिथे! :))

मी प्रचंड खूष होते! किती वर्षांनी ते पण नाही आठवत आता.. पण नक्कीच लहानपणी पेशवे पार्क पाहीले, त्यानंतर आजच प्राणीसंग्रहालयात गेले.. जाम मजा!

सुरवातीला पिटुकल्या प्राण्यांनी आणि पक्षांनी सुरवात झाली.. एक कुठलीतरी जंगली मांजर, Alligator (किती जवळची वाटली ती मगर! माझीच रास! :D), वाळवंटात राहणारे प्राणी इत्यादी पाहीले.. वाळवंटातले प्राणी तर अगदीच वेगळे होते.. काडीसारखा दिसणारा किडा, लिबलिबीत बेडूक, निवांत झोपलेल्या lizards, भला मोठा पाण्यात पहुडलेला अजगर!

LA मधेही पुणेरी पाट्या असतात बरं! नेमका माझा कॅमेरा नव्हता माझ्या सोबत.. नाहीतर काढणारच होते फोटो! प्रवेशद्वारालाच पाटी लावली होती! हीट वेव्ह आल्यामुळे सगळे प्राणी सावलीत /शेड मधे झोपले आहेत. काही व्हीजिबल नसतील..काहीतरी आवाज काढून प्राण्यांना उगाच घाबरवू अथवा दचकवू नये ! :D

सुरवातीचे लिंबूटिंबू प्राणी पाहून फायनली मेन झू ला निघालो.. मला कधी पासून वाघ सिंह बघायचे होते...
पण समोर आला बर्ड शो! आता युनिव्हर्सल आणि सीवर्ल्डचा इतका अत्त्युत्तम शो बघितल्यावर हा सो सो च वाटला.. फक्त साद दिल्यावर खूप लांबून डोंगरावरून पक्षी येत होते.. ते फार भारी! एक सप्तरंगी पोपट लिटरली माझ्या डोक्यावर पाय ठेऊन गेला! :)))

तो शो झाल्यावर आम्ही साउथ आफ्रीकन विभागात गेलो.. कुठला तरी भला मोठा पक्षी होता! नाव बिव विसरले! :( तो पाहील्यावर काही माकडं पाहीली.. हेहे फांद्याना लटकत होती.. आणि आम्हा प्रेक्षकांना वाकुल्या दाखवून खाणं चाललं होतं.. पलिकडे कुठला तरी बगळ्याच्या कॅटॅगरीतला, सोनेरी पाय आणि नाकावर तुरा असलेला पक्षी कॅटवॉक करत उगाच इकडून तिकडे जात होता! :)

सहज मागे पाहीलं तर मागच्या पिंजर्‍यात चक्क जग्वार!! आहाहा! कस्ला देखणा दिसत होता.. पण तसा छोटाच असावा.. आणि काळाही नव्हता! त्यामुळे बरंय.. मला काळ्या जग्वारची भयंकर भिती वाटते...(म्हणजे भिती वाटायला तो काही खेळायला येत नाही माझ्या घरी! apocalypto नावाच्या सिनेमात तसेच अजुन बर्‍याच सिनेमात त्याचे भितीदायक दर्शन घडलंय!) हा छान सोनेरी, त्यावर काळे ठिपके आणि चौकोन असलेला होता! क्युट होता! नंतर तर तो बॉलशी खेळत बसल्याने अगदीच लहान बाळासारखा वाटला! :))
त्याच्याशेजारीच ते घाणेरडं व्हल्चर, गिधाड चक्क शांतपणे बसले होते.. रादर भेदरून... तेव्हा समजलं बच्चा असला तरी जग्वारचा बच्चा आहे ! मग आम्हीही तिथून सटकलो ! :)

आगीतून फुफाट्यात म्हणतात ना, ते असं! बच्चा जग्वारच्या तावडीतून सुटून आलो तर समोर चक्क वाघ! मी तर पळतच सुटले.. वाघ या प्राण्याबद्दल मला भयंकर attraction आहे ! देखणा,तितकाच हिंस्त्र.. वाघोबाकाकांचा मूड अगदीच खराब होता! जरा वृद्ध होता किंचित.. पण तरी चेहर्‍यावर अती-हिंस्त्र भाव! किती लांबून बघत होतो आम्ही, तरी भेदरलो होतो! वाघ नुसता इकडून तिकडे अस्वस्थपणे फेर्‍या मारत होता! या टोकापासून त्या टोकापर्यंत.. उकाड्याने हैराण झाला अस्णार.. जिभ बाहेर काढून नुस्ता हाफ हुफ करत होता! नुसताच इकडून तिकडे फिरणार्‍या वाघाला पाहून लोकांनी पण दंगा करायला सुरवात केली.. जरा गप्पा, गोंधळ व्हायला लागला.. आणि वाघाने जी काही डरकाळी फोडली ना!! Ohh Myy Godd !! थिजून जाणे कशाला म्हणतात ते कळले.. लागोपाठ ७-८ डरकाळया फोडल्यावर मग जरा वाघ शांत झाला.. आणि... आमच्या समोर येऊन थांबला क्षणभर ! मी त्याच्या पर्फेक्ट समोर होते.. मधे तसं म्हटलं तर काहीच नव्हतं! पाण्याचा ओढ्याटाईप होतं.. आणि जरा चढावर गवत.. वाघाच्या अन माझ्या नजरेची एक क्षण नजरानजर झाली.. ! ऐकलं होतंच, अनुभवलेही... वाघाच्या नजरेत नजर मिळवली की तुम्ही एक क्षण संमोहीतच होऊन जाता! काय देखणा प्राणी! म्हातारपणीही हॅंडसम दिसत होता! :)

जागोजागी ब्रेक म्हणून माकडं होती.. इतकी माकडं पाहीलीयेत बापरे ! जगात माकडांची संख्या काही कमी नाहीये म्हणजे ! पुढे माउंटन तापिर नावाचा डुक्कर प्लस अस्वल असा दिसणारा प्राणी दिसला.. गलिच्छ वाटला! :( (सॉरी तापिर !! )

नंतर स्नो चिताह खिडकीत आपल्या कमी होणार्‍या लोकसंख्येचा विचार करत ध्यानमग्न असा बसला होता! तो इतका दुख्खी वाटला की काय विचारायची सोय नाही! २००० च उरलेत आता आख्ख्या जगात!
त्याच्याशेजारी अस्वल होतं.. त्याचं काय चालले होते ते शेवटपर्यंत कळले नाही! इकडून तिकडे.. मग गुहेत.. मग परत भिंतीच्या कडेकडेने! काय बोर होत असेल ना प्राण्यांना तिथे ??

अस्वलाच्या शेजारी तळं होतं... आणि त्यात दोन पक्षी उगाच फिरत होते ! म्हटलं यांच्या साठी आख्खं तळं?? मग नंतर दिसला.. भिंतीला टेकून पहुडलेला हिप्पो !! आईग.. किती ते वजनदार प्रकरण! नाक,तोंड फार बेक्कार असतं ब्वॉ हिप्पोचे ! जरा नीट पाहीले तर त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते! :( काय कारण असेल हिप्पो रडण्याचे ??? I could not think of any reason.. शेवटी त्याला Don't cry, be happy असं म्हणून निघाले ! त्याच्याकडे बघून कझिनचा नवरा म्हटला शरद पवारांची आठवण येतीय !! लोल !!

मग नंतर ..अरे देवा ! चिंपांझी! त्यांचा मोठ्ठा पिंजरा होता! आणि त्यात आधी आम्हाला ३ चिंप्स दिसले.. नंतर एक एक वाढून चक्क १०-१२ चिंपांझी आले ! केसाळ बुटकी माणसं जमल्यासारखीच वाटत होती.. नंटर काय झालं माहीत नाही, ते सगळे माणसांसारखेच भांडू लागले! २ जण बहुतेक बाकीच्यांना घाबरवत असावेत ! कोणीही खेळायच्या एरिआत आले की ते २घं त्यांना पळवून लावायचे आरडा-ओरडा करून! बापरे... तो फार्स अर्धा तास बघत बसलो आम्ही!! मजा आली! त्यांची भाषा समजली असती तर भांडणाचे कारणही कळले असते! .. असो...

मग पुढे जिराफांची फॅमिली पाहीली... उंचच उंच... उंच लोकांना एक superiority complex अस्तो.. तसाच त्यांनाही वाटला.. सगळे इतके शायनिंग मारत फिरत होते ना मान ताठ ठेऊन !! त्यातल्या त्यात एक जिराफ-पिल्लू बुटकं होतं! मला मग तेच आवडलं!! :))

नंतर सफारी शटल मधून उगाच चकरा मारल्या.. ऑस्ट्रीच, उंट, कांगारू , हरणं इत्यादी प्राणी पाहीले आणि आलो घरी!!

संपला माझा "प्राणीसंग्रहलायातील एक दिवस" वरचा निबंध!! :D

२० मे, २००९

दगडावर कोरलेले क्षण..

गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! :)

 • अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो क्षण! एकदम लाडाने उठवायला सुरवात व्हायची! काहीतरी लाडीक बोलत बसायचे.. तेव्हा मी जागी असूनही पडून राहायचे.. पण आपोआप एक हसू फुटायचे आणि मग आई बाबांना समजायचे की मी जागीय! :) तरीही मी पुढे लोळत पडायचे.. मग त्या लाडाची जागा आधी ४-४ दा हाका मारण्यात, नंतर ओरडण्यात .. क्वचित एखाद्या धपाट्यात व्हायची! :) काहीही असलं तरी तो क्षण मला खूप आवडायचा! तसेच दादा उठवायला आला की तो प्रथम माझ्याबरोबर झोपून टाकायचा, आणि मग १५ मिनिटांना उठून पायाला ओढून रेल्वे रेल्वे खेळून उठवायचा! ते ही भन्नाट!
 • शाळेत असतानाची हिवाळ्यातली सकाळ.. ती कडाकडा दात वाजवणारी थंडी मला अजुनही आवडते.. (तिचा कितीही त्रास झाला तरी!)
 • लहानपणी मामा अमेरिकेतून पेपरमेट्सची पेनं आणायचा ढीगभर! त्याचा तो गुळगुळीत आणि स्लीम स्पर्ष अजुन हातात आहे! परवा मुद्दाम जाऊन घेऊन आले पेपरमेट! i just love those pens!
 • सातवीत असताना वर्गात पहीली आले होते .. बहुतेक शैक्षणिक वर्षांत एकदाच झाले असेल असे! :)
 • आठवीत असताना लोखंडे बाईंनी सायन्सचा धडा वाचून अवघड स्पेलिंग्स लिहून आणायला सांगितली होती.. (सेमी-इंग्लिश तेव्हापासूनच चालू होते ना.. जाम अवघड वाटायचे सायन्स इंग्लिशमधून .. पण नंतर मराठीतून वाचल्यावर कळले.. इंग्लिशमधूनच बरेय!) सर्व वर्गाने बरेच लिहीले होते.. माझी वही कोरी.. तीच बाईंनी बघितली! चिडून पुढे बोलवले.. आणि मिसलेनिअसचे स्पेलिंग विचारले! ते पर्फेक्ट सांगता आल्यावर झालेला त्यांचा चेहरा! तसेच त्याचबरोबर आठवणारी आठवण म्हणजे त्या सेमिस्टरला सायन्समधे पहीली आलेली मी! LOL.. याचीही कधीच पुनरावृत्ती झाली नाही! :)
 • आनंददायक नाही! पण ९वी १०वी ही निरस वर्षं होती , हे ही आठवते लगेच!
 • १०वी मधे मात्र जेव्हा माझ्या दातांचे ब्रेसेस काढले तेव्हा फुटलेले हसू! अवर्णनिय होते! तोंडात दातच नाहीत की काय असं वाटलं होते!
 • ४-५वी पासून सुरू झालेले बॅडमिंटन! PYC, डेक्कनच्या ग्राउंडवर मारलेल्या वॉर्मअपच्या फेर्‍या! त्यानंतर झालेल्या बॅडमिंटनच्या मॅचेस.. आणि ९०% वेळा जिंकणारी मी! ते दिवस मी कधीच विसरू शकणार नाही! मी कोणीतरी बेस्ट आहे हे फिलिंग त्याकाळात खूप मिळाले!
 • ४थीत झालेली लक्षद्वीपची ट्रीप! तिथल्या अरबी समुद्रात शिकलेले पोहणे!
 • नंतर सुरू झाले स्विमिंगचे दिवस! उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज सकाळी ७-८ भरपूर पोहण्याच्या लॅप्स करून,पोटात भुकेचा डोंब घेऊन घरी यायचे.. झोपाळ्यात बसून ठकठक-चंपक-किशोरच्या साथीने ऑम्लेट आणि मॅन्गो मिल्कशेप चापायचे ते क्षण!!
 • बाबांना कधी चुकुनमाकून कॅरममधे हरवले असेल, तर तो क्षण!
 • आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांच्या प्रॅक्टीस सेशन्स! ऍक्चुअल गणेशोत्सव!
 • इंजिनिअरिंगला जाम त्रास देत असलेला क्रिटीकल झालेला ऍप-मेक सुटला तो आख्खा दिवसच ! :)
 • थर्ड इअरनंतर मात्र पीएल्समधे MIT library च्या पायर्‍यांवर बसून केलेला जीवतोड अभ्यास! स्वीटीबरोबरचा अभ्यास! रात्री फोनवरून मैत्रिणींबरोबर केलेला अभ्यास! तेही दिवस अफलातून! पहील्यांदाच जिगर्सच्या वाटेला न जाता, रेफरंस बुक आणून, नोट्स काढून वगैरे केला होता अभ्यास!
 • डिस्टींक्शन हुकल्याने झालेली निराशा! सर्व जग चांगले मार्क्स पडले म्हणून कौतुक करत होते.. तर मी लिटरली निराश होते!
 • नंतरचा जॉबसाठीचा वाईट्ट स्ट्रगल!
 • इन्नीआज्जीच्या घरच्या लाल-वेल्वेटच्या दुलईत दुपारी झोपणे!
 • आज्जीनीच शिकवलेल्या कविता..
 • दादाने घेतलेले माझे फिजिक्सचे बौद्धीक! :(((
 • रात्री गार्डन कोर्टमधले जेवण.. त्याहीपेक्षा तो माहौल!
 • माझी रोजची कॉलेजमधली एन्ट्री! :D जीन्स, क्रीम जॅकेट, क्रीम साईड बॅग, आणि डाव्या हातात काळे हेल्मेट! :) i used to feel like i am a hero! please note not heroine! a hero ! :D
 • आयुष्यात जेव्हा जेव्हा (आणि त्या वेळा कमीच आहेत!) मला दादागिरी करता आली! :) उदाहरणार्थ : SE ला NCPL नावाच्या प्रॅक्टीकलला मी जी सुटायचे प्रोग्रॅम्स करत, तो स्पीड, माझी विचारशक्ती, ग्रास्पींग पॉवर.. मलाच खरं नाही वाटत.. रीना मॅडम म्हणायच्या क्लासच्या जरातरी बरोबर राहा! नेक्स्ट सेमचे प्रोग्स आताच करणार का? :">
 • स्वीटी, स्कुटी अन मी.. अशक्य फिरलो.. पालवी मधे किती चहा ,दुर्गाची कोल्डकॉफी ढोसलीय कल्पना नाही! इंजिनिअरिंगच्या त्या रखरखाटातले छान क्षण!
 • वेताळ/हनुमान/ARAI/लॉ-कॉलेजची टेकडी ! मैत्रिणींबरोबर गप्पा मारत टेकडी चढून वरच्या खडकावर बसून, समोरच कलत जाणारा सूर्यास्त बघायचा! आणि..
 • नेहेमीचा आणि आजन्म आवडीचा क्षण राहील तो म्हणजे पहीला पाऊस, पहीला ’तो’ मातीचा वास.. त्यापुढे सारं फिक्कं!
अजुन खूप खुप्प आहेत! पण कसं सगळं लिहीणार.. त्याहीपेक्षा ते आठवणार? त्यामुळे इथेच बास करते.. यातही जमतील तशा ऍडीशन्स होतीलच याची खात्री! Obviously.. Life does not stop surprising you with those moments.. you just have to notice them! :)
Signature2

१८ मे, २००९

कॉलेजचे भन्नाट दिवस!

ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..
इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!
जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! :) , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! :)

का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते!
खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल..

"माझे इंजिनिअरिंगचे दिवस!" :) गाथा होईल याची लिटरली!

अस्मादिक तसे डोक्याने बरे असण्यापेक्षा नशिब बलवत्तर असल्यानेच बर्‍याच गोष्टी मिळवू शकले..
त्यातली एक इंजिनिअरिंगची डिग्री! :D
(मैत्रिणींना हे पटायचे नाही! त्यांना वाटायचे मी ’भयंकर’ अभ्यासू आहे! आणि त्यांना न सांगता मी रात्र रात्र अभ्यास करते वगैरे! lol.. )
खरं सांगायचे तर मी कधीच अभ्यास केला नाही!! नाही म्हणायला आई आवर्जून मी पहिलीत असताना कशी स्वत:हून अभ्यासाला बसायचे, कवीता म्हणायचे इत्यादी सांगते.. अर्थातच ती तिथेच थांबते.. बहुदा मी नंतर अभ्यास केला नसावा! हेहे..

शाळेत मी तशी बडबडी आणि शांत(किंवा शिष्ठ!) अशी दोन्ही अर्थांनी प्रसिद्ध.. म्हणजे जे ओळखीचे आहेत त्यांच्याशी अखंड बडबड करणार! पण नव्याने ओळखी करून घेण्याच्या नावाने बोंब.. तो एक फॉल्ट माझ्यात अजुनही आहे! मी संवादामधे खूप कमी पडते.. पण कोणी स्वत:हून आले माझ्याशी बोलायला की यूहू! स्वारी खुष! मग अगदी घरी बोलवणार त्या व्यक्तीला.. असो..

तर शाळेत मी अशीच प्रसिद्ध (असावे कदाचित).. हुषार वगैरे काही संबंध नाही! :)

तिथून मग ११वीला आले शेजारच्याच कर्नाटक शाळेत.. हो, ती ११वीलाही शाळाच होती! आख्ख्या ११-१२वीमधे मी १किंवा २ दा लेक्चर्स बंक केले.. :( फारच वाईट झाले! जाऊदे..
शाळा असली तर ढिंक्च्यॅक होती एक्दम! सगळे फाड फाड विंग्रंजी, डायरेक्ट तर्खडकरांच्या घरून आल्यासारखे बोलायचे! :| मराठी मिडीयम (समाधानासाठी म्हणायचे सेमी इंग्लिश मिडीयम! ) मधून आलेली मी.. जाम बावचळले होते! कसं होणार या ठिकाणी, सतत चिंता.. पण तिथेही मजाच झाली!
पहील्याच दिवशी कॉलेज सुटल्यावर .. चिखल लागलेल्या जिन्यावरून धडधडत धपाक्कन मी खाली! अशा रितीने माझी , माझ्या बॅचमेट्सशी ओळख झाली! हेहेहे.. काय पण फिल्मी!
तेव्हा अजुन एक किस्सा झालेला.. माझे केस अतिशय कुरळे आहेत.. तेव्हा माझा शॉर्ट मश्रुम कट असायचा.. मी प्रचंड सडपातळ होते! (हाय रे देवा तशीच का नाही राहीले! :( ) जीन्स टीशर्ट शिवाय दुसरे कपडे मी कधीच घालत नाही! तेव्हाही नाही, आजही नाही.. तर, मला कोणीतरी चक्क मुलगाच समजले होते! धमाल आली होती! आख्खा क्लास हसून लोटपोट.. ! करमणूकच होते बहुतेक मी! :D

असो.. तर सांगायचा मुद्दा हा की, अभ्यास जरा दुय्यमच प्रकार माझ्यासाठी.. पण येस.. नशिबाने मला जोरदार साथ दिली! जे मी वाचायचे ते १००% लक्षात राहायचे.. त्यातलेच ७०-८०% पेपरमधे यायचे.. झाले ना ७०-८०% मार्क्स! :)) अशा रितीने १२वी संपली!
१२वी नंतर मी खूप म्हणजे खूपच कॉन्फिडंट होते.. इंजिनिअर होणार! तेही कंप्युटर! ११-१२वीला व्होकेशनल म्हणून कंप्युटर्सच होते म्हणून बरे.. बरेच काय काय शिकले.. तो एक विषय आवडीने शिकले बुआ.. बेसिक पास्कल सारख्या भाषा शिकले होते! त्या बाईंचा चेहरा आठवतोय , नाव विसरले.. पण त्यांनी क्लासला फ्लॉपी कशी चालवायची इथपासून शिकवल्याचे आठवतंय! Lol.. ! १०वी पासून माझ्या घरात इंटरनेट असल्याने त्या क्लासला मात्र मला जरा पुढे पुढे करता आले! :D
एकंदरित.. ११-१२वी हा सुवर्णकाळ होता! मला कधीही न मिळालेल्या जीवाभावाच्या मैत्रिणींचा ग्रुप मिळाला! मी,प्री,मिथू,अमृ,योगी आणि स्मि! आम्ही ६ जणींनी जी काय धमाल केली आहे त्याला तोड नाही! २-३ वर्षं नुस्ता धिंगाणा केला होता! नंतर अमृ गेली रशियाला, मिथु US ला, प्री.. गा-य-ब ! मग स्मि,योगी आणि मी प्रत्यक्ष कॉन्टॅक्टमधे राहीलो.. तर मिथू अन माझी मैत्री ३०-४०Kb च्या इमेल्समधून बहरली! :) माझ्याच कॉलनीत राहणारी ही मुलगी मला कर्नाटकला ११वी मधे भेटली! :)) असो.. तिच्यावर,माझ्या प्रत्येक मैत्रिणीवर स्वतंत्र पोस्ट होईल.. !

१२वी झाल्यावर बाबांना काही केल्या खात्री वाटत नव्हती की मला इंजिनिअरींगला ऍडमिशन मिळेल.. ते सारखे मागे लागले.. BCS ची एन्ट्रन्स तरी देऊन ठेव.. मग शेवटी मी म्हटलं ठीके.. पण तेव्हा (परत )
नशिबानेच स्मि,रम्या,आणि सुवी या माझ्या मैत्रिणी फर्ग्युसन मधे बीसीएसच्या क्लासला जाणार होत्या! मीही मग पळत त्यांना जॉईन झाले! ते २ महीने आहा होते ! तसा अभ्यास होता.. पण त्या परिक्षेला काही माझ्या दृष्टीने महत्व नसल्याने अभ्यास (तिथेही) नाही केला.. नुस्ती धमाल! सकाळी ८ ला बाबा सोडायचे फर्ग्युसन मधे.. दुपार पर्यंत लेक्चर्सला बसून थोडा अभ्यास जास्त टाईमपास.. मग ३ का ४ वाजता आधी फर्ग्युसन पासून डेक्कन पर्यंत चालत.. मग तिथून कर्वे रोड पर्यंत टमट्मने.. आणि कर्वे रोड पासून घरी परत चालत!
एव्हढे कष्ट मी एरवी नक्कीच घेतले नसते... केवळ फर्ग्युसन म्हणून! काय क्रेझ होती फर्ग्युसनची! माय गॉड!

असो.. यथावकाश नशिबानेच BCS एन्ट्रन्सला उत्तम मार्क पडून देखील मी इंजिनिअरिंगला MIT मधे दाखल झाले.. अंहं.. MIT Womens! फर्ग्युसन मधून मुलींच्या कॉलेजमधे म्हणजे जामच अधोगती! हेहे.. चालायचेच.. इंजिनिअरिंगसाठी वाटेल ते!

- क्रमशः ..

-----------------------------------------------------------------------------
हे क्रमशः उगीच ! जनरली मला सगळं एकटाकी लिहून काढायला आवडते.. पण हे फारच मोठे होतेय.. वाचायला कंटाळा येतो .. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या गमती-जमती नंतर !
-----------------------------------------------------------------------------
Signature2

१३ मे, २००९

आईची कवीता.. संक्रांत..

अमेरिकेतल्या आणि एकंदरीतच रिसेशनवर, माझ्या आईने संक्रातीच्या दरम्यान केलेली कवीता..

आली आली संक्रांत आली..
पण यावेळेला मात्र नेहेमीपेक्षा जरा लवकरच आली...
कोणत्या देशावर आली .. कोणत्या बाजूने आली?
कशावर आली??

अहो, अमेरिकेवर संक्रांत आली, लेहमनच्या दिशेने आली..
Auto Industry वर संक्रांत आली..
शेअर मार्केटवर संक्रांत आली..
कित्येकांच्या नोकरीवर गदा आली..
ज्या घरांचा भक्कम आधार होता, त्या घरांवर गदा आली..
घर सोडून बाहेर राहायची वेळ त्यांच्यावर आली..

मोठी मोठी स्वप्नं त्यांची सत्यात नाही आली..
हा जय मग कोणाचा? श्रीमंतांचा की गरिबांचा?
आम्हाला केक मिळत नाही, मग तुम्हीही खाऊ नका म्हणणार्‍यांचा..
! बा आणि माच ठरवतील भविष्यकाळ तुमचा..
समृद्धीचा देश तुमचा Currency सतत फिरवणार्‍यांचा..
पार्टीसाठी सुद्धा कर्ज काढणारा, पण चैनीत कमी नाही पडणारा!
सांभाळून रे बाबांनो..
एकवेळ जेवणाचे ताट द्या पण बसायचा पाट देऊ नका तुम्ही..
४ पैसे गाठीला ठेवा, टुकीने तुम्ही संसार करा..
मने तुम्ही साफ ठेवा.. मनाची श्रीमंती सांभाळून ठेवा..
आपल्याकडे आपण संक्रांत म्हणजे संक्रमण समजतो..
वाईट विचार हेवे दावे कटुता विसरून आपण जातो..
तीळाचा स्नेह गुळाची गोडी जपून आपण ठेवतो..
आणि म्हणूनच,
तीळगूळ घ्या थोडंतरी बोला..
तीळगूळ घ्या गोड-गोड बोला..
तीळगूळ घ्या खूप खूप बोला..

७ मे, २००९

मी - एक करोडपती! :)


My site is worth $9.79 Million.
How much is yours worth?


तुमचं काय मतं? :)
आणि हो.. कोणी असेल करोडपती , ही साईट वाचणारा, त्याने करोड पेक्षा जास्त ऑफर केली साईटसाठी तरी चालेल मला.. (चालेल काय, पळेल! )

Signature2

४ मे, २००९

माझ्या आयपॉडमधील खजिना! :)

अशी कुठली गोष्ट आहे , जी तुम्हाला काही सेकंदात वेगवेगळ्या ठिकाणांहून फिरवून आणते? मिनिटा-मिनिटाला तुमचे मूड्स बदलवू शकते? बसल्या जागी ताल धरायला लावते? :) ....... बरोब्बर ओळखलंत!...... संगीत.. !

मी चुकून तानसेनांच्या घरात आलेली मुलगी! :) माझी आई सही गाते! आणि तिला गाणं प्रचंड आवडते.. आमच्या घरातला ती रेडीओ आहे! :) इतका सतत चालू असतो तो, की मला बोलणं मुश्किल व्हायचे.. एखादा शब्द उच्चारला तरी आई त्यावरून गाणी आठवून म्हणू शकायची!
हाहा.. मी तिला नेहेमी चिडवते... "सारखी सांगत असतेस, तुमच्या लहानपणी टीव्ही, रेडीओ काही नसायचे.. कॉलेज होईपर्यंत पिक्चर बघितला नाही तुम्ही थेटरात! मग इतकी गाणी कशी माहीत, आणि ती पण तोंडपाठ!? "
आईचे उत्तर असायचे... "आमच्याकडे नव्हताच रेडीओ, समोरच्यांकडे होता !!" :)))

बाबांचाही आवाज अतिशय गोड! :) पण अर्थात त्यांना ताला-बिलात गायची कधी गरज वाटली नाही! :) तरीही मस्त वाटते बाबांचे गाणे ऐकायला.. बाबांच्या तोंडून "स्वरगंगेच्या काठावर.." किंवा " सुहानी रात.. ढल चुकी.. " वगैरे गाणी ऐकायला मस्त वाटते.. मी तर असं ऐकले होते.. की बालगंधर्व हे माझे लांबचे आजोबा का कोणीतरी लागतात.. तेव्हा ते गाणं थोडंफार आलं असावं त्यांच्या गळ्यात !

नवराही उत्तम गातो! म्हणजे शिकला वगैरे नसला तरी अचानक अमेरिकेत शिकायला आल्यावर त्याने युनिव्हर्सिटीमधे आयुष्यातलं पहीलं गाणं म्हटलं.. "कैसी है ये रुत.. " !! काहीतरी काय अरे? कधी गाणं शिकले वगैरे नसताना हे गाणं म्हणायचे? आणि ते ही भन्नाट सही?? हेहे.. सगळ्यांनी त्याला मग डोक्यावर घेतले.. आणि मग काय दर वर्षी दिवाळीत वगैरे युनि मधे याचे गाणं होणारच!

तर सांगायचा मुद्दा.. अशी परिस्थिती आणि अशी माणसं आसपास असताना मी अजुन एकदाही धड गाऊ शकले नाहीये... एकदाच... फक्त एकदाच नवर्‍याने आग्रह केला म्हणून गायले.. नंतर त्याने कधीच नाव काढले नाही! :)))
त्यामुळे मी तानसेन कधीच होऊ शकत नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे! :) पण कानसेन मात्र झाले...

परवा असंच आठवत होते.. की नक्की कधी पासून मी गाणी ऐकू लागले? आठवेचना!! म्हणजे इतका अविभाज्य भाग झाला की काय हा माझ्या आयुष्याचा? काय ते माहीत नाही ब्वॉ.. पण खूप लहानपणापासून ऐकतेय गाणी इतकं नक्की....

अगदी लहान... शाळेत असताना रंगोली,छायागीत वगैरेच्या कृपेने हिंदी गाणी कानावर पडतच होती! अर्थात, ती कानावर पडत होती.. मला ’काय’ ऐकू यायचे हा एक चिंतनीय विषय आहे! :))) (आता सांगायला हरकत नाही, मला अजुनही धड हिंदी येत नाही!! समोरचा हिंदी बोलू लागला की मी लिटरली ततपप करायला लागते! बम्बैया हिंदीही नाही हो! म्हणजे काय म्हणायचे आता... असो..) तर लहानपणी माझी फार मजा व्हायची! मला साधे साधे शब्दही कळायचे नाहीत... मी निरागसपणे विचारायचे, "मतलब, म्हणजे काय हो??"
बाकी ते हिंदी कम उर्दु शब्दांची तर बातच न्यारी !! मी लहानपणी काय पद्धतीने पिक्चर्स पाहीलेत मलाच माहीत.. एक वाक्य कळेल तर शप्पथ! :) गाणी पण मग असंच काहीतरी मनचं टाकून म्हणायची! लाला लिलि ला करत...

एकीकडे आई तिची आवडीची गाणी लावायचीच.. उदाहरणार्थ, खेड्यामधले घर कौलारू, घननीळा लडीवाळा, धुंद मधुमती किंवा एकदम शास्त्रीय नाहीतर नाट्य संगीत !! हे नाट्यसंगीताचे काय कळत नाही बुआ आपल्याला... त्याकाळी कोणी चांगला गीतकार मिळत नाही म्हणून हा संगीतप्रकार उदयास आला का?
नाही, एकच ओळ १७६० वेळा म्हणतात म्हणून हा प्रश्न... मला तर पुढची वेगळी ओळ ऐकू आली की मी टाळ्याच वाजवायचे..

एकदा आईनी मला आणि बाबांना संगीत मत्स्यगंधा या नाटकाला नेले... तसा बाबांना काय फरक नाही पडत.. खूष असतात ते अशा ठिकाणी यायला.. मस्त ३-४ तास एसी मधे झोप होते.. मधे बटाटावडा आणि चहा मिळतो.. अजुन काय पाहीजे ? त्यामुळे ते आले आनंदाने.. मी?? आधी जरा आईच्या धाकाने मन लावून पाहायला लागले नाटक... पुढच्या अर्ध्या तासात मी ही सहन न होऊन झोपून गेले..

इतके गंमतशीर प्रकार होत असताना.. हे सगळं कमी की काय, म्हणून मी दादाकडे मोर्चा वळवला... त्याच्यात-माझ्यात तसं ६-७ वर्षांचे अंतर.. त्यामुळे मी लहान असताना तो बर्‍यापैकी मोठा होता.. (माहीतीय, हे वाक्य फार कॉमेडी झालेय.. मला असं म्हणायचेय की मी ६-७ वीत असताना तो कॉलेजला होता.. )
तेव्हाच्या त्याच्या सगळ्या कॅसेट्स काहीतरी अगम्य गाण्यांनी भरून गेलेल्या असायच्या..
नंतर कळले की ती गाणी इंग्रजी या भाषेत आहेत ! तेव्हा मी अवाक झाले होते ! असं असतं इंग्लिश? मग मी काय शिकतेय शाळेत? ते इंग्लिश वापरून मी कधी या गाण्यांमधे काय म्हण्तायत ते ओळखू शकणार? ह्म... यालाही कारण आहे.. तेव्हा दादा नेमका मायकेल जॅक्सनचा फॅन होता ! :)) एकच उदा: सांगते.. जॅम या त्याच्या गाण्याचे मी केलेले भाषांतर... " जॅम.. घे घे.. तू घे तू घे... घे... तू... , मला दे थोडा .. जॅम ! " LOL

पण कळत नसूनही मी त्या संगीताने खूप ओढले गेले त्या गाण्यांकडे.. तेव्हापासून अजुनही मी MJ ची मोठ्ठी फॅन आहे ! रादर असं म्हणेन की Mj च्या गाण्यांची फॅन आहे... बाकी तो , त्याचे पर्सनल लाईफ, आरोप गेले खड्ड्यात! गाणी, म्युझिक, बीट्स, काही गाण्यांचे शब्द, अफलातून आहेत !!

मग काय त्या कॅसेट्सची पारायणे करणे सुरूच झाले.. असंख्य वेळेला ऐकली ती सर्व गाणी.. पुढे शाळेत मानसी भेटली.. तेव्हा जॅक्सनच्या हेट क्लब मधेच भर असायची.. कोणी सापडायचेच नाही जॅक्सनची गाणी आवडणारा.. मात्र मानसीशी(माझ्या अतिशय जवळच्या स्पेशल मैत्रीणीशी) मैत्री झाली तीच जॅक्सनमुळे... (thanks MJ! )एकमेकींच्या कलेक्शन मुळे ती आवड निवड अजुनच वाढत गेली! डेंजरस, हिस्टरी, बॅड, थ्रिलर वगैरे... सगळ्या मैत्रिणींमधे आमचे वेगळं विश्व होतं!

८-९वी पर्यंत मग समजू लागले.. की आपल्याला गाणी ऐकायला भयंकर आवडतात.. मग तर सतत एम टीव्ही, व्ही टीव्ही , घरातल्या कॅसेट्स, इत्यादी चालूच असायचे.. आईबाबांमुळे अधुन मधुन जुनीही गाणी ऐकली.. पण तो काळ म्हणजे Teenager असल्याने आवडूनही न आवडल्यासारखे दाखवण्यातच वेळ जायचा! :))

तेव्हापासून असंख्य गाणी ऐकली.. शब्दांपेक्षा मी संगीतावर खूप प्रेम करते... मला अजुनही गाण्यात शब्दांपेक्षा त्यातील बीट्स, रिदम, किंवा एखादा सिंथ, गिटार किंवा तबल्याचा पीस जास्त आवडतो.. केवळ एखाद्या अशा पीस साठी मी ते आख्खं गाण कैक वेळा ऐकलंय... म्हणजे न आवडणारं गाणं असेल, मात्र तसा एखादा पीस असला की मी गाणं ऐकायचेच.. आणि तो विवक्षित(बरोबरे का हा शब्द! :O ) तुकडा वाजला की मला काय समाधान मिळायचे!

एनिग्माचे माझे प्रेम याचमुळे... वेड लावणारे अनेक तुकडे असतात त्यांच्या गाण्यात ! जगातील वेग वेगळ्या भागांतील संगीत, वाद्यं घेऊन संगीत तयार करणारा तो म्युझिकल ग्रुप ! का नाही आवड्णार ? टीएन्टी फॉर द ब्रेन अशा विचित्र नावाच्या गाण्यातला तबला वेड लावतो.. २०,००० माईल्स ओव्हर द सी या गाण्यातला एकन एक पीस... इन्व्हीझिबल लव्ह.. बियॉंड द इन्विझिबल... जाऊदे... त्यांची सगळीच गाणी...

अर्थात... सगळं गाणं त्यातल्या प्रत्येक वाद्याच्या तुकड्यासकट पाठ झालं की मग नक्कीच माझं लक्ष त्यातल्या शब्दांकडे जाते... :) अशी अर्थपूर्ण गाणीही आवडतात मला... पण तो प्रेफरंस नंतरचा! कानाला कसं वाटतंय़? ते पहीलं.... !

नक्की कशामुळे ठाऊक नाही... पण गेल्या ४-५ वर्षांत मी शास्त्रीय, नाट्य संगीतही एन्जॉय करू शकते.. रादर काही काही गाणी, राग मला फार आवडतात... जसराजांचा दरबारी कानडा मी ऐकला, आणि ऐकतच राहीले... त्यातले ते शिवानंद रूपम शिवोहम शिवोहम ऐकलं की इतकं प्रसन्न वाटते... तसेच नाट्य संगीतही... लाईव्ह ऐकले आणि जास्त आवडले... (या प्रांतात मात्र मला फार ऐकायचे आहे.. अजुन मी बालवाडीतही नाही आले.. )

मी हे सगळं असंबद्ध का लिहीत आहे माहीत नाही... पण अनेक दिवसांपासून माझं गाण्याचे वेड जरा कमी झाले आहे... कशाने कल्पना नाही, पण आजकाल पूर्वीइतकी प्रचंड प्रमाणात गाणीच ऐकली नाही जात आहेत.. ते पूर्वीचे मंतरलेले दिवस आठवून जरा बरं वाटलं! :) होपफुली परत तेव्हढ्याच दमाने मी गाणी ऐकू लागेन! :) किती सुंदर संगीत करून ठेवलंय जगात लोकांनी!? कधी होणार ऐकून काय माहीत !! :)

Signature2

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...