एल.ए.चा ट्रॅफीक!
काय शब्दच सुचेना झालेत मला तर आजकाल. इतका भयाण ट्रॅफीक मी खरंच आख्ख्या आयुष्यात पाहीला नाही. हो, अगदी पुण्यातला अलिकडचा वाढलेला ट्रॅफीकही फिक्का आहे अगदी ह्याच्यासमोर. अर्धा-एक तास कधी नुस्तंच स्टिअरिंग व्हील हातात पकडून बसून राहायचे तर कधी आपलं ५ माईल च्या स्पीडने चालवत, व प्रत्येक मिनिटात किमान १७ वेळा तरी ब्रेक दाबत गाडी चालवायची. चालवायची हे क्रियापद फारच फास्ट आहे. रेटायची, ओढायची वगैरे ठिके. अर्थात फ्रीवे नसेल तर दर काही फुटांवर येणारे व जीव जाईस्तोवर लालच राहणरे सिग्नलचे दिवे येतात. त्यातून रस्ते काही सबर्बसारखे प्रशस्त नाहीत.. सगळा गिचमिडकाला.. इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे ना इथे गाडी चालवणे. सिरिअसली.
दोनेक वर्षापूर्वी मला एका कामानिमित्त एके ठिकाणी भल्या सकाळी ८ वाजता पोचायचे असायचे. कित्तीही सकाळी उठले तरीही मी आपली १० ते १५ मिनिटं उशीराच उगवणार. समजतच नाही मला असे होते तरी कसे? बरं अंतर किती असेल ते? ६ नाहीतर ७ माईल्स! ६-७ माईल्सना साधारण ३० माईल्स ताशी वेगाने गेल्यास किती वेळ लागावा? २०-२५ मिनिटं? चला अजुन एक्स्ट्राची १५ मिनिटं अॅड करूया. पाऊण तासात पोचू म्…