मुख्य सामग्रीवर वगळा

अमेरिका पूर्वरंग – बाल्टीमोर ..

सकाळी ७ वाजता बाल्टीमोर एअरपोर्टवर आमचे विमान उतरले. विमान उतरायच्या आधी वरून दिसणारी हिरवळ पाहून नाही म्हटले तरी डोळे जरा विस्फारलेच गेले! कॅलिफॉर्निया म्हणजे तसा दुष्काळीच भाग! उजाड पिवळे डोंगर, पामची झाडं आणि सतत समुद्र.. त्यामुळे पिवळा व नीळ्या रंगांचेच अधिपत्य! इथे दूरवर पसरलेला हिरवागार रंग फार फार सुरेख वाटला त्यामुळे !
मामा घ्यायला आला होताच. त्याच्याशी गप्पा मारत निघालो घरी जायला. आणि लिटरली आपण एखाद्या जंगलातून जातोय असा मला भास झाला. गच्च झाडी! गेली दोन वर्षं हे असलं काही पाहायची सवयच गेली होती.. मला सर्वात जास्त इस्टकोस्टची ही झाडंच आवडली! एकही कोपरा, साधा चौकोन सुद्धा मोकळा नाही! रस्ता, त्याच्या कडेला ही भरगच्च झाडं .. जोडीला सकाळचा सुखद गारवा! वाह !
घरी आलो.. ते भलं मोठं घर.. सॉरी महालच की तो! तो पाहून परत डोळे विस्फारले! कॅलिफॉर्निया फार महाग. त्यामुळे घरं = खुराडं! अर्थात भारतातल्या घरांची तुलना केली तर कॅलिफॉर्नियातली घरं सुद्धा मोठीच, पण इथे काहीतरी वेगळंच होतं! बेसमेंट जे बहुतेक वेस्ट कोस्टात नसते. बेसमेंट म्हणजे आपला ४-५ खोल्यांचा फ्लॅटच की.. :) आणि मग त्यावर अजुन दोन मजले! .. त्यामुळे घर तर आवडून गेलंच.. पण सगळ्यात जास्त आवडला तो म्हणजे डेक.. समोर दूरवर पसरलेली हिरवं लॉन, झाडं आहेतच! सुंदर लाकडी डेक, त्यावर कडेला बसायला लाकडीच नक्षीदार बाकं, एका कोपर्‍यात झोपाळा, आणि डाव्या कोपर्‍यात मोठं कॉफी टेबल.. आम्ही तिथेच विसावलो.. मामीने लगेचच अफलातून अशी निनादची आवडीची साबुदाणा खिचडी आणि माझ्या आवडीचा गरम गरम शिरा आणून ठेवला!आदल्या दुपारपासून पोटात काही नसल्यामुळे आम्ही तुटूनच पडलो! आधीच आयता ब्रेकफास्ट त्यातून इतका चविष्ट, इतक्या सुंदर हिरव्या आणि गार वातावरणात .. दिल खुष हुआ! त्यानंतर आला स्पेश्शल केशर घातलेला चहा! मी पहील्यांदाच प्यायला.. आणि तो खरंच स्पेशल होता! जोडीला अखंड गप्पा आहेतच! .. लहानपणापासून मामाचे घर याबद्दल मला इतके आकर्षण होते! कारण तेव्हा , २६-२७ वर्षांपूर्वी काही लोकं फारशी अमेरिकेला जात नसत. निदान आमच्या घरातला तो पहिलाच. त्यातून मामा भारतात आल्यावर मिळणार्‍या मस्त मस्त गिफ्ट्स!, त्याची ती भलीमोठ्ठी बॅग उघडल्यावर येणारा टिपिकल अमेरिकेचा वास! तो बहुतेक मलाच यायचा.. कारण कोणाच्याही तो लक्षात नाहीये! तो कसा आहे हे सुद्धा मी सांगू नाही शकत, पण यायचा खरं! त्या सर्वांमुळे इतकी म्हणजे इतकी उत्सुकता होती ना मामाकडे जायची, ती एकदाची २५ वर्षांनी पुरी झाली! :)
खाणं झाल्यावर फ्रेश होऊन आम्ही निघालो मॉर्निंगवॉकला.. जस्ट ऊन पडायला सुरवात झाली होती. शेजारीच तळे आहे एक तिथे चालायला गेलो.. वॉव, मॉर्निंगवॉकला गप्पा मारत जाणं, ते ही तळ्याकाठी!! मी जाम खुष! ती जागाच इतकी सुंदर होती की क्या कहने!


भरपूर गप्पा झाल्यावर आणि घामेघूम झाल्यावर आम्ही निघालो परत. इकडचे तिकडचे पाहात घरी जाईपर्यंत जेवणाची वेळ झालीच. परत एकदा आयतं + चविष्ट जेवण हजर! स्पेशल चिकन, कांदा बटाटा रस्सा, कोशिंबिर, पोळ्या, पुलाव आणि रसमलाई! जबरदस्त जेवण झाले .. आणि आम्ही झोपेच्या अधीन झालो. रात्रभर प्रवासात पाय आखडून बसावे लागल्याने झोप अशी झालीच नव्हती. त्यामुळे दुपारी मस्त ३एक तास झोपलो. आता दमल्यामुळे इतके झोपलो की ३ तासाच्या फरकामुळे जेट लॅग आला माहीत नाही पण झोपलो खरं खूप.. एकदम छान फ्रेश वाटले.
संध्याकाळी उठून बाल्टीमोर हार्बर, डाउनटाऊन पाहायला गेलो. मामाच्या टीमने, कंपनीने जवळपास ते सर्व हार्बर बांधले आहे. त्यामुळे अजुनच छान वाटले ते. एकदम हॅपनिंग जागा होती ती! भर्र्पूर्र लोकं! लाईव्ह म्युझिक, एकीकडे पाण्यात बोटींग आणि क्रुझेस, भरपूर खाण्याची हॉटेल्स, छान नितळ पाणी, त्यातले ते सनसेटच्या वेळेस पडणारे प्रतिबिंब! काय काय सांगू आणि कशाकशाचे वर्णन करू! इतकी सुंदर जागा होती ती…
भरपूर फोटोगिरी केली तिथे. आणि आलो परत ..
परत येताना आम्हा सर्वांचा आवडता पापा जॉन्सचा पिझ्झा घेतला , आणि मस्त पिझ्झा पार्टी केली!! पिझ्झानंतर खाल्लेले आईसक्रीम बिस्कीट तर महान होते!! :)
आमची दुपारी भलतीच झोप झाल्यामुळे आम्ही टक्क जागे होतो ! मग आम्ही दोघं ’ताल’ पाहात बसलो.. खूपच दिवसांनी पाहील्यामुळे काय धमाल आली! मला आवडतो तो मुव्ही.. गाणी विशेषत: फार सही आहेत! तो पाहीला आणि कधीतरी १-१.३०ला झोपलो..
दुसर्‍या दिवशी खूप पाहायचे – फिरायचे होते! वॉशिंग्टन डीसी!!
टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्तकं येऊ लागली. .मग चंपक,ठकठक, किशोर मासिक,  गोट्या, चिंगी, साने गुरूजींचा सेट असं होत होत मी भयानकच वाचनकिडा झाले. मग एेतिहासिक कादंबर्यांचे दिवस आले. स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी ही पुस्कं कितीदा वाचली कोण जाणे. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मृत्युंजय वाचणे हे रिच्युअल बनुन गेले होते. (कर्णावर मेजर क्रश होता त्या काळात.. 😅) मग कधीतरी महाभारताचे सर्व खंड वाचून काढले. तेव्हाच हळूहळू बाबांच्या इंग्रजी / मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे वळले.  आमच्या घरात बाबा सतत वाचत असायचे. गम्मत म्हणजे बाबा म्हणतात आधी ते काहीच वाचायचे नाहीत पण आईमुळे वाचू लागले वगैरे. तेव्हा गम्मत वाटलेली कारण आई कधीच पुस्तक वाचताना दिसली नव्हती. पण ५०एक क्लोज नातेवाईकांची आवकजावक असलेल्या घरात, आजीचे सर्व करून तसेच ९ते ६:३० डिफेन्सची नोकरी करुन तिला वाचन वगैरे शक्यच नव्ह…

तो पाऊस.. हा पाऊस..

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय. मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस.. पाऊस.. ! का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! )
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद.. लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो!
वाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो ! बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक? पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता.. पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्‍याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी, मानसी व विशाखा…

काय बोलत असतील ती दोघं?

आज बाहेरची कामं आटोपून घरी येताना सिग्नलला थांबले होते. सहज बसस्टॉपकडे नजर गेली तर एक वेगळंच दृश्य दिसले. इकडे लॉस एंजिलीसमध्ये बसस्टॉपपाशी खूप होमलेस लोकं दिसतात. (आय मिन एकाच स्टॉपपाशी खूप लोकं नव्हे. जनरल पूर्वीच्या गावापेक्षा इकडे होमलेस जास्त दिसतात. एखाद्या स्टॉपवर, डिव्हायडरवर एखाद-दुसराच माणूस असतो..) जवळच एखादी बेवारशी शॉपिंग कार्ट, त्यात अठरापगड गोष्टी असतात. कोणीतरी एखादे गरम जॅकेट वा कम्फर्टर दिले असते ते घेऊन तो माणूस बसलेला असतो.. क्वचित स्त्रियाही असतात. इथे एक वेगळंच आहे. आपण भारतात असताना सरसकट रस्त्यावरच्या लोकांना भिकारी म्हणतो. इथे तसे होत नाही. इथे होमलेस म्हणतात. होमलेस लोकं पुअर, जॉबलेसही असू शकतात पण क्वचित कधी त्यांना व्यवस्थित नोकर्‍याही असू शकतात. राहायला मात्र जागा नसते. माझ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या जवळच्या बसस्टॉपपाशी राहणारा माणूस मी जाते त्याच ग्रोसरी स्टोअरमध्ये शॉपिंग करतो. आय मिन एखादेच काहीतरी कॅन्ड फुड वगैरे. पण तोही दिसतो मला तिथे.. एनीवे.. तर हा होमलेस माणूस, जुनेच पण एकंदरीत परिस्थितीशी फटकून असलेले सोनेरी बटणांचे क्वॉड्राय जॅकेट घालून, डोक…