अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !
माझ्या परवा लक्षात आले, मी डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे.. डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर व्हायला लागले आता इतके निवांतपणे लिहीणे..
ओके.. So, मॉन्युमेंट झाल्यावर आमच्यात त्राण नव्हते. दिवस संध्याकाळकडे कलू लागला तसे आम्ही निघालो. आता व्हाईट हाऊस पाहून पटकन मेट्रो पकडायची असे ठरवले. जवळच आहे असे वाटणारे व्हाईट हाऊस चांगलंच लांब होते. कसे तरी लंगडत, थांबत थांबत गेलो एकदाचे तिकडे ! खरं म्हणजे मी आपले दिल्लीतले राष्ट्रपती भवन सुद्धा पाहीले नाहीये त्यामुळे व्हाईट हाऊस म्हटल्यावर मी कंटाळा टाकून परत फ्रेश झाले. चुकून माकून ओबामा दिसलाच तर बरंय ना?
आत्ता तो सगळा प्रसंग आठवताना इतके हसू येतंय ना! ते लांबवर पसरलेले व्हाईट हाऊस, त्याच्यापुढे कारंजे, फुलझाडे – बाग वगैरे, त्यापुढे ही भली मोठी लॉन , त्यापुढे लोखंडी ग्रिलचे कुंपण .. आणि तिथून ही सगळी व्हीजिटर्स लोकं डोकं आत घालून घालून डोकावतायत! त्या बिचार्या ओबामाला तर झूमधल्या पिंजर्यातल्या प्राण्यांसारखेच वाटत असेल नाही? :laugh:
आमची फोटोगिरी संपवून आम्ही निघणार तेव्हढ्यात निनादला तिथे समोरच्या व्हरांड्यातून कुत्रे फिरताना दिसले. आम्ही लगेच सगळं साहीत्य काढून बघायला लागलो.. आमच्या कॅमेर्याच्या 12X ऑप्टीकल झूमने तिथे कोणीतरी बसले आहे हे कळत होते. आम्ही जाम खुष !
तेव्हढ्यात आम्हाला लक्षात आले की आमच्याकडे हॅंडीकॅम आहे, ज्याला प्रचंड ताकदीचे झूम आहे. अगदी २०००x पर्यंतचे ऑप्टीकल झूम! त्यामुळे आम्ही लगेचच तो काढला, व बघू लागलो. त्या व्हरांड्यात मिशेल ओबामा होती. बिचारीकडे बरेच जण संध्याकाळच्या चहा-पोहे साठी आले असावेत. बरीच ये जा होती. आम्ही शूटींग घेतलेच , थोडेफार कॅमेर्याने फोटो घेतले. शूटींग नंतर अपलोड करीन.. सद्ध्या इतकेच..
शुटींगमध्ये अगदी व्यवस्थित कळून येते! खरं म्हणजे सुरवातील ५-१० मिनिटे ओबामा सारखाच माणूस काहीतरी लिहीत बसला होता, तो नंतर निघून गेला.. पण तो तिथे फार कमी वेळ असल्याने कदाचित तो भास झाला असावा असे म्हणून आम्ही सोडून दिले.. पण ही नक्कीच ही !
शेवटी तास-दिड तास शुटींग घेऊन आम्ही एकदाचे निघालो तिथून..
परतीच्या वाटेवर डिसीचे फार सुरेख फोटो मिळाले. आख्ख्या डीसीत किती पुतळे व राजेशाही इमारती आहेत हे जरा शोधले पाहीजे. जिथे नजर टाकावी तिथे पुतळे व अश्या इमारती ! मजाच !
हे सगळं टिपले आणि निघालो परत मामाच्या घरी. आता उद्या सकाळी न्युयॉर्क !
टिप्पण्या