ल्हानपण देगा देवा !

आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल.
आज मी अगदी दिल खोलके स्मृतीरंजन करणार आहे. (हे मराठी साईट्स वाचून काय भलतेच शब्द आठवतात.. स्मृतीरंजन कस्लं आलं डोंबलाचे!) असो.
मला किती लहानपणचे आठवतंय असा खेळ करून पाहायची इच्छा झाली एकदम. बहुतेक बालवाडी. अभिनव शाळेत मी होते. तो मरूनीश लाल युनिफॉर्म, फुग्याच्या बाह्या, पांढरे मोजे, लाल वेल्क्रोचे शूज, भरपूर पावडर लावलेली चब्बी चब्बी गालांची मी व डोक्यावर पांढरा हेअरबॅंड व मोगर्‍याचा गजरा, हातात लालच प्लॅस्टीकची जाळीजाळीची डब्याची (स्टीलचा, डबलडेकर डब्बा! :) ) व वॉटरबॉटलची पिशवी.. हे तयार होणे, तो सगळा युनिफॉर्म, तो घ्यायला गेलो होतो ते डेक्कनवरचे पूर्ण पोषाख, शाळेत शूज घ्यायला गेलो असताना माझ्या अवाढव्य पायाचा साईझ पाहून पहिलीतल्या मुलाचे शूज मला देणे. सर्व आठवतंय!! कसलं क्युट! तेव्हा आमचा गृप फोटो काढलेला देखील आठवतोय. तो तर महा गोड आहे. इथे द्यायचा मोह होतोय. :)
childhood memoriesसगळ्यात उजवीकडची खालच्या रोमधली मी. :) [टॅग करणार्‍याने फारच चित्रकला केलीय त्याबद्दल सॉरी! पण माझ्याकडचा फोटो सापडणे फार मुष्कील आहे.. ]
असो.. तेव्हाच्या प्रगतीपुस्तकावरचे शेरे मला अजुन आठवतात. आठवतात म्हणजे मी वाचते ते. अजुनही जपुन ठेवलंय ते. वेल, त्याला प्रगतीपुस्तक म्हणणे फारच रखरखीत आहे. इतकं गोड पुस्तक आहे ते. मी मोगरा ग्रुपमध्येच होते वाट्टं. बाईंनी लिहीले होते की ही फार मिक्स होत नाही, एकटीच खेळत असते. सर्व वार, आकडे, रंग ओळखू येतात. :) सगळ्यांसमोर येऊन गाणी म्हणणे आवडत नाही. बुजते फार. थोडक्यात मोकळी होत नाही पटकन. तेव्हढं पाहा असं पालकांना सांगितले होते. :) मला कमाल याची वाटते, की त्या बाईंनी माझा स्वभाव किती परफेक्ट ओळखावा? मी अश्शीच आहे! तेव्हाही मी मुलांच्यात जाऊन खेळण्यापेक्षा एकटंच चित्र रंगवणे, नाहीतर चिकटकाम करणे अशा गोष्टीत इंटरेस्ट घ्यायचे. पुढेही जरा तसेच. अभिनव मध्ये मी ६ वी पर्यंत होते. माझे मित्र-मैत्रिणी म्हणजे – माझ्या शेजारीच बसायच्या म्हणून दिप्ती,बेला मैत्रिणी व एकाच कॉलनीत राहयचो म्हणून आया एकत्र शाळेत पाठवायच्या त्यामुळे झालेले मित्र – ओंकार किशोर. बस्स.. :| बाकी सर्वांशी बोलत बिलत असीन मी. पण तेव्हा मला मैत्र यांच्याशीच वाटायचे. तसे आजूबाजूला बसणारे देखील माझे फ्रेंड्स होते. माझा मैत्रीचा पल्ला कधीच एक-दोन बेंचेसच्या पलिकडे का गेला नाही हे मला उमगत नाहीये! पण तसं आठवायला गेलं तर मागच्या बेंचवर बसणारा स्कॉलर जंगम(जंगम तू हे वाचत असशील बहुतेक! :D ) त्याच्या शेजारी कोण बसायचे आठवत नाही. पण आम्ही एका तासाला जोक्सचे पुस्तक वाचत बसलेलो आठवतंय. किंवा हात फ्रॅक्चर झालेला राजे. अभिनव व पुढे गरवारेला देखील सेम वर्गात , मागच्याच बेंचवर बसाणारा आल्हाद, जबरी लंगडी खेळणारी स्नेहा, प्राची व दिप्ती नावाच्या असंख्य मुली, एकाच रिक्षेतली माझ्यासारखेच कुरळे केस असणारी पुजा, देविका, सायली दिप्ती या जिवाभावाच्या मैत्रिणी, चब्बी गालांची स्वाती, एक(की दोन) ट्विन्सही होत्या नाव विसरले.. .. कितीतरी.. [ अजुनही मला अभिनवचे क्लासमेट्स दिसले की वाटतं मला ओळखत तरी असतील का ते? पण ओळखतात हे ऐकून अजुन मजा वाटते!] हा फोटो पाहून हे सगळे आठवले.. अवघडे ब्वॉ..
अभिनवचे दिवस फार सही होते. आमच्या कॉलनीतले सगळेच अभिनवला जायचे. त्यामुळे धमाल होती. सकाळी सगळे एकाच फाटक बाईंकडे इंग्लिशच्या क्लासला जायचो. मी,ओंकार,किशोर,बॅडमिंटन चॅम्प विशाखा , माझी बर्थ डेट शेअर करणरा सुरजित, आणि गरवारेची सावनी.. सकाळचा क्लास झाला की घरी येऊन जेवून दुपारी १२ ला शाळेला निघायचे. मी ओंकार किशोर चालत जायचो. ते दोघं अगदी जिवश्च कंठश्च मित्र. कदाचित मला मधेच आईने त्यांच्या बरोबर पाठवण्याने वैतागलेही असतील! पण २-३ वर्षं गेलो एकत्र आम्ही. रस्त्याने गप्पा मारत, उड्या मारत शाळेला जायचे. थोडं मोठं झाल्यावर तर मला आठवतंय :D शाळेपाशी आल्यावर आम्ही रस्ते वेगळे करायचो. बाकीची मुलं हसू नयेत म्हणून.. लोल काहीही वागायचो तेव्हा! ..
नंतर शाळा बदलली. व गरवारेला आले. इथे कॉलनीतलीच ती सावनी मैत्रिण झाली. दोघी सायकलवरून जाऊ-येऊ लागलो. शाळेच्या आधी संस्कृतचा क्लास. सावनीला संस्कृतचा तिरस्कार म्हणता येईल इतपत राग. मला आवडायचे पण टाईमपास जास्त प्रिय! मी रितसर क्लासची फी भरून वगैरे तो बुडवून तिच्या घरी टाईमपास करत बसायचे. :O नंतर अर्थातच समजले आईला. जबरी ओरडा बसला. व एकदाची जाऊ लागले रेग्युलर. [ आणि अर्थातच संस्कृत अजुन आवडू लागले! ती सुभाषितांची वही आत्ता इंडीया ट्रिपला मुद्दाम शोधून घेऊन आले.. ]
नववीच्या दरम्यान माझ्या शालेय मैत्र जीवनात एक पोकळी आली. सावनीला दुसरी मैत्रिण सापडली. व मी एकटी. केवळ एकच मैत्रीण जीवाभावाची करण्याची सवय महागात पडते हे तेव्हा समजायला हवे होते. पण समजले तर काय ना! चुका कशा होणार! प्रचंड एकटी पडले होते मी. [यात सावनीचा दोष अर्थात नाही. तो माझाच. ] पण मग नववी हे वर्ष फार विचित्र गेले. अभ्यासाचे खोबरे केले. ते मला किती महागात पडले हे केवळ मलाच माहीत ! पण झाले खरे तसे. पण नशीबाने नववी संपता संपता मानसी मैत्रीण झाली [म्हणजे तीने स्वत:हून ओळख करून घेतली म्हणूनच. नाहीतर मी तेव्हढीच बुजरी तेव्हाही होते.. ] मानसी मैत्रिण झाली ती झालीच.. अजुनही आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत!
थोडा अभ्यास हळूहळू ट्रॅकवर येऊ लागला. व दहावीत अगदीच फजितवाडा होण्यापासून वाचले.
ही मानसी मला कशी भेटली बहुतेक मी मागे लिहीले होते. आमची मैत्री मायकेल जॅक्सनमुळे झाली! दोघींना (व बहुतेक आम्हा दोघींनाच) तो आवडायचा. व त्याच गाणी/कॅसेट्स/अल्बम्सची देवाण घेवाण करताना आमची मैत्री वाढली. केवळ जॅक्सन आवडतो या कारणामुळे तीनी मला भेटल्याच्या दुसर्‍याच दिवशी डेंजरस या अल्बमची ओरिजिनल कॅसेट आणून दिली होती! वॉव! हे म्हणजे सर्वात प्रेशस गोष्ट.. कशी काय माहीत नाही पण आमची मैत्री खूप टिकली. अजुनही.. किती वेगळ्या आहोत आम्ही. एकही विचार सारखे नाहीत म्हटले तरी चालेल! ती बरीच बंडखोर, खूपशी मॅच्युअर्ड, प्रॅक्टीकल तर मी बर्‍यापैकी कॉन्झर्व्हेटीव्ह, कंप्लिटली चाईल्डीश, इम्प्रॅक्टीकल व अती इमोशनल. धमाल होती.. रोज भांडायचो ! रोज ते मिटायचे. एकदा तर फालतू कारणावरून भांडल्यावर नंतर ती सॉरी म्हणायला आली -ते पण शाळेच्या ग्राऊंड समोरच्या प्लॅटफॉर्मवर आणि मी तीला माफ करायला तिला हसत हसत थोबाडीत मारली होती! शाळेतल्या सर्व मुला-मुलींसमोर.. अजुनही ती तो अपमान विसरली नसेल.. :) ))
हे आजचे असंबद्ध लिखाण शेवटी मानसी पुराणावरच येऊन थांबतंय असं दिसतंय. पण विचार केला तर ते तसंच आहे. ती माझी खरी पहीली जिवाभावाची मैत्रीण. शाळा – मैत्रीणी म्हटलं की तीच आठवते मला काय करू मी! :) मला वाईट वाटते की मी पहिलीपासून गरवारे मध्ये नव्हते किंवा ती अभिनव मध्ये नव्हती. शाळेतला काळ सही असतो. तो नेमका आम्हाला १-१.५ वर्षंच मिळाला.. पुढे १०वीला आम्ही एकाच क्लासात नाव टाकलं. सिरियस्ली अभ्यास कसा करयचा हे बरचसं तिच्यामुळे कळ्लं. नाहीतर अस्मादिक जरा ’लक’ या गोष्टीवरच अवलंबून. एकदा वाचायचे व सोडून द्यायचे. परिक्षेत आठवेल ते आठवेल! तिच्यामुळे थोडा सिरीयस्ली अभ्यास केला. वेल थोडाच! त्याउलट मीच तिला अभ्यास सोडून फोनवर गप्पा मारायची सवय लावली ! :) अव्याहत गप्पा – बाबांनी फार पेशंस दाखवला त्या काळात! दर महिन्याचे फोनचे बिल पाहून नुसती मान हलवायचे !! त्या आमच्या गप्पा नंतरही चालू राहील्या पुढे १०-१२ वर्षं!! व नंतर मी लग्न करून USAला आले. किती रडली ती.. :(
ओह गॉड.. इम्पॉसिबल आहे हे.. का अशी स्थित्यंतरं होतात माहीत नाही.. आत्ताच्या ट्रिपला मी २ महिने भारतात होते. पण आम्ही दोघी केवळ २ वेळाच भेटू शकलो. :( दोघींची लग्न.. सासर.. जबाबदार्‍या.. uh.. या सगळ्या प्रकरणांमधून मैत्री तशीच ठेवणं किती अवघड आहे! अर्थात मैत्री राहतेच हो.. पण ते रेग्युलर बोलणं, गप्पा, बरोबर टवाळक्या करत फिरणे ! कसं शक्य होणार काय माहीत..
असूदे.. म्हातार्‍या झाल्यावर फिरू एफ्सी रोडवर.. त्यात काय एव्हढं!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives