पुस्तकं आणि मी...


मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आली. गलिव्हरस ट्रॅव्हल्स आणि तत्सम मराठी अनुवाद होते छोटे. लहानपणीपासून पेपर पण वाचायचे. मग माझ्यासाठी स्पेशल पुस्तकं येऊ लागली. .मग चंपक,ठकठक, किशोर मासिक,  गोट्या, चिंगी, साने गुरूजींचा सेट असं होत होत मी भयानकच वाचनकिडा झाले. मग एेतिहासिक कादंबर्यांचे दिवस आले. स्वामी, मृत्युंजय, श्रीमान योगी ही पुस्कं कितीदा वाचली कोण जाणे. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मृत्युंजय वाचणे हे रिच्युअल बनुन गेले होते. (कर्णावर मेजर क्रश होता त्या काळात.. 😅) मग कधीतरी महाभारताचे सर्व खंड वाचून काढले. तेव्हाच हळूहळू बाबांच्या इंग्रजी / मॅनेजमेंटच्या पुस्तकांकडे वळले.  आमच्या घरात बाबा सतत वाचत असायचे. गम्मत म्हणजे बाबा म्हणतात आधी ते काहीच वाचायचे नाहीत पण आईमुळे वाचू लागले वगैरे. तेव्हा गम्मत वाटलेली कारण आई कधीच पुस्तक वाचताना दिसली नव्हती. पण ५०एक क्लोज नातेवाईकांची आवकजावक असलेल्या घरात, आजीचे सर्व करून तसेच ९ते ६:३० डिफेन्सची नोकरी करुन तिला वाचन वगैरे शक्यच नव्हते. (पण ती खूप आवडीने कविता करायची- करते). बाबांची मॅनेजमेंट पुस्तकं मला खूप काळ पुरली. द गोल, सेव्हन हॅबिट्स सारखी पुस्तकं मी १२वीच्या सुट्टीत वाचून काढली. अर्थात हे केवळ उदा. अशी ५०एक पुस्तकं असतील. याच काळात जी ए वाचायचा प्रयत्न केल्याचे आठवते. पण मला तेव्हा फारसे कळले नसावे.. 😬एकीकडे घरातील सर्व इंटरेस्टींग पुस्तकं वाचून झाल्याने मग मी लायब्ररी लावली. नारळीकरांच्या सायन्स फिक्शन्स, गौरी, सानिया असे वेगळेच जग समोर आले. लग्न करून अमेरिकेत आल्यावर जरा अवघड गेले. मी जरी भरपूर इंग्रजी वाचन केले असले व इथल्या लायब्रर्या अफाट मोठ्या  सुसज्ज असल्या तरी मराठी वाचन जसे होते तसे काहीच कनेक्ट होईना.. अजिबात  मराठी पुस्तकं  नसणं हे कसले सफोकेटिंग असते हे तेव्हा जामच जाणवले. ही माझी रड ऐकून मायबोली वरच्या रूनीने मला ४ पुस्तकं पाठवली. तो महिना सगळ्यात बेस्ट होता. मग हळूहळू लिस्ट करणे व दर देशवारीत पुस्तकं घेऊन येणे चालू केले.
पण गेल्या दहा वर्षात एस्पेशली इंटरनेट व सोशल मिडिया अस्तित्वात आल्यापासून वाचन मात्र कमी होत गेले आहे. नील झाल्पासून तर थांबलेच आहे. आता कळते आई कधीच बाबांइतकी वाचत बसलेली का दिसली नाही.. 😊अर्थात आम्ही मोठे झाल्यावर आईचे वाचन चालू राहिलेच तसंच माझेही होईल या आशेवर आहे मी.. पण जगात इत...की पुस्तके असताना आपलं कधी वाचुन होणार या कल्पनेने अगदी ॲन्झायटीच येते. मग फेसबुक बंद करुन एखाद्या पुस्तकाची १० पानं जरी वाचली तरी जीव जरा शांत होतो.. 😇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives