बटर चिकन

मागच्या आठवड्यात बटर चिकन केले होते. हल्ली महिन्यातून दोनदातरी होतेच ते. इथे Los Angeles, मध्ये आल्यापासून आम्हाला विविध रेस्टॉरंट्सच्या होम डिलिव्हरीची फार सवय लागली होती! पण एकंदरीत सर्व इंडीयन रेस्टॉरंट्सप्रमाणे कुठेही कन्सिस्टन्सी नाही हो! मागच्या वेळेस अमुक मधीन ढमुक चांगले होते म्हणावे तर पुढच्या वेळेस नक्की घोळ होणार! शेवटी स्वतः करून , एक फिक्स रेसिपी शोधणे आले. हल्ली तेच बरे वाटते. मनापासून खाल्लेही जाते!  :) 

माझ्या ब्लॉगवर २००८ मध्ये मी ही पोस्ट लिहीली होती. खरं म्हणजे ती रेस्पी म्हणावी तर बटर चिकनची नाहीये! [पण आम्ही हीच रेसीपी वापरून केलेली तेव्हाची डिश मात्र बटर चिकनसारखीच लागत होती! :))] पण ते काही खरे नव्हे. चांगली ऑथेंटीक रेस्पी परत लिहीलीच पाहीजे मला. 
ही घ्या ट्राईड & टेस्टेड बटर चिकनची पाककृती! :) 


लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
५०० ते ७०० ग्रॅम बोनलेस, स्किनलेस चिकन ब्रेस्ट
मोठा चमचा दही
अर्धा चमचा लिंबाचा रस
हळद
२ मोठे कांदे
२ टोमॅटो
६-७ मोठ्या लसूण पाकळ्या
बटर (भरपूर!)
८फ्लु औंझ हेवी व्हिपिंग क्रीमचा छोटा पॅक मिळतो. तो अर्धा तरी लागेल. स्मित
५-७ बदाम व ५-६ काजू (गरम पाण्यात अर्धा तास तरी भिजवतठेवावेत)
२-३ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
एक चमचा साखर
मसाल्यासाठी:
२-३ तमालपत्रं
६-७ मिरीदाणे
५-६ लवंग
दालचिनी पूड चिमुटभर
वेलदोडा पूड चिमुटभर
एक लाल सुकी मिरची
बदामाची पूड ३-४ मोठे चमचे
हे सर्व भाजून मग वाटून घ्यावे.
क्रमवार पाककृती: 
चिकन स्वच्छ धुऊन, त्याचे बाईट साईझ तुकडे करून त्यावर लिंबाचा रस, हळद, तिखट, मीठ व दही घालून मुरवायला ठेवावे. जेव्हढा जास्त काळ तेव्हढं चांगलंच! (मी कमीत कमी ३०-४० मिनिटं ठेऊन देखील केलेले आहे. पण ४-५ तास ठेवले तर मस्तच!)
पॅनमध्ये तेलात(किंवा बटरमध्ये) लसूण परतायला घ्यावा. तो जरा सोनेरी झाला की त्यात कांदा घालून चांगला भरपूर, कॅरॅमलाईज्ड होईपर्यंत परतावा.
मग त्यात टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत मिश्रण परतवून/शिजवून घ्यावे.
जरा गार झाले की वाटून घ्यावे.
ज्याच्यात चिकन बनवणार आहात त्यात (मनसोक्त) बटर तापवून त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे. थोडंसं हाय फ्लेमवर हलके शिजवावे.. चिकन पांढरटसर दिसू लागले की कांदा-लसूण-टोमॅटोची प्युरी घालावी.
जरावेळाने वाटलेला मसाला घालावा.
२-३ चमचे तिखट, मीठ घालावे. कसूरी मेथी चुरून घालावी.
बदाम-काजूची पेस्ट मिसळवावी. हवा असल्यास ऑरेंज फुड कलरही घालता येईल.
हेवी व्हिपिंग क्रीम अ‍ॅड करावे,
मग झाकण ठेऊन चिकन शिजू द्यावे.
चिकन शिजल्यानंतर चव पाहावी. सर्व मसाल्यांची छान चव आली असेल परंतू गोडूस चव आली नसेल तर थोडीशी साखर घालावी. काजूची पेस्टही वाढवता येईल. वरून एक चमचा मेल्टेड बटर घालावे.
झाले, बटर चिकन तयार!! स्मित
वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!