माझे रंगकाम -१


मैत्रीणवर (www.maitrin.com) जेव्हा मला मोठ्या माणसांसाठी असणार्या कलरींग बुक्सबद्दल कळले( थँक्स लोला!), तेव्हापासून मी ह्या कल्पनेने फार खुष झाले होते. मला माझ्यासाठी एखादं पुस्तक मिळणार! नाहीतर मी आपली मुलाचीच कलरिंग बुक्स घेऊन बसायचे. मुलाला कितपत इंटरेस्ट आला माहीत नाही पण माझा मात्र चांगलाच टिकला होता. शेवटी एक 'मिस्टीकल मंडल' नावाचे पुस्तक घेतले व मुलाच्या रंगीत खडूंनी रंगवायला सुरवात केली. इतकी मजा आली! छान मन लावून, फोकसने चित्र रंगवत बसण्यात काय धमाल येते!

तुम्ही विचार करत असाल, अरे बापरे, ही रोज चित्रं रंगवणार व इथे चिकटवणार की काय.. तर कदाचित हो. झालंय असं. मला हातात चिक्कार वेळ मिळतो. परंतू अलिकडे माझ्या लक्षात आले होते की मी बराच वेळ वायाच घालवत आहे. http://maitrin.com/node/288 हा लेख ह्या सगळ्यावरूनच सुचला होता. भरपूर वेळ, भरपूर रिसोर्सेस हाताशी आहेत, पण काहीच भरीव होत नाहीये आयुष्यात असं चित्र दिसू लागले होते. ( म्हणून चित्रांमध्ये रंग भरू लागले!  biggrin ) मी किती संकल्प ठरवून एकदाही पाळले नाहीयेत गेल्या वर्षभरात, हे आठवले की चिंताग्रस्त होत होत. (अजुनही फळ खाण्याचा संकल्प हवेतच आहे. )

अर्थात हे सगळं ठरवून नाही हा प्रोजेक्ट चालू केला. उगीच ते मंडलाचे पुस्तक दिसले म्हणून घेतले. व रंगवताना जाणवले, की ही अॅक्टीव्हिटी अशी आहे की मी मन लावून, फोकसने चित्र पूर्ण करीनच. समहाऊ माझा इतर ठिकाणी दिसणारा आरंभशूर स्वभावापुढे ही कन्सिस्टन्सी मला एकदम रिलॅक्स करून गेली. हाताशी वेळ आला की पूर्वी उग्गच फेसबुकवर सत्राशेसाठ लिंका वाचत बसण्यापेक्षा मार्कर घेऊन चित्रातला छोटासा का होईना कोपरा रंगवायचा, एव्हढं एकंच ठरवले. आश्चर्यकारक रीत्या मला उत्साह जास्त जाणवू लागला. सगळी कामं झटापट होऊन चित्रासाठी १५ मिनिटं काढणं म्हणजे पार्टीच होती. मला वयाची ३ दशकं उलटल्यावर समजले आहे की मी आळशी नाहीये उलट मला सतत काहीतरी करायचे असते, ते काय करायचे हे न कळल्याने उगीच सगळी धरपकड. पण सध्या एकाच हॉबीवर, अॅक्टीव्हिटीवर मन केंद्रीत केले आहे. आणि मला खूप छान वाटत आहे! :)

 हे ते पहिले चित्र.

पुस्तक - मिस्टीकल मंडला. माध्यम - खडू.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'मेरू'

Archives