गेले काही महीने मस्त गेले.. नवर्‍याने बरीच पुस्तकं आणली भारतातून.. ती वाचण्यात मस्त वेळ गेला. मुक्काम-गौरी देशपांडे, इजिप्तायन,मेक्सिकोपर्व - डॉ. मीना प्रभु, माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग, हसरे दुख्ख - भा.द. खेर (मागे एकदा चार्ली चॅप्लिनचे पुस्तक वाचल्यावर पोस्ट लिहीली होती, तेव्हा खूप जणांनी याचे नाव घेतले होते.. आवडले..पण बेस्ट नाही वाटले! अनुवाद आहे कळते,काही भाग इतका विनोदी पद्धतीने उरकला आहे! असो..) त्यानंतर वाचले वपुंचे एक पुस्तक-नाही आवडले विशेष, मला त्यांचे महोत्सव आवडलंय तितकं बाकीचे नाही आवडणार बहुतेक.. पुलंची ऑल टाईम फेव पुस्तकं वाचून झाली, आता गाडी वळाली पानिपत ! 
ऐतिहासिक पुस्तकं/कादंबर्‍या वाचण्याविषयी माझं जरा त्रांगडं झालंय ! मी सिरीअसली वाचायची सुरवात केली ’श्रीमान योगी’ पासून.. अज्जुन आठवतंय मला! बाबा तेव्हा सोलापुरला होते. त्यांच्या ऑफीसच्या गेस्टहाऊस मधे आम्ही राहायचो जेव्हा जायचो तेव्हा.. मला माहीतीय जागांची वर्णनं असं लिखीत स्वरूपात वाचणे फार त्रासदायक आहे! पण मी लिहीणार ! :) मी ते कधीही विसरणार नाही, तरी मला ते परत परत सांगायला, लिहायला आवडते.. :) गेस्ट हाऊस म्हणजे वेगवेगळे मोठ्ठाले बंगले होते.. तसा बंगला मी कधीही पाहीला नाही.. 
उजवीकडच्या कोपर्‍यात मोठं फाटक, त्याच्या समोर गोलाकार पण आडवा पसरलेला बैठा बंगला.. समोर भरपूर झाडं.. फाटकातून शिरतानाच बंगल्याच्या मागची साईड, तिथे लॉन आहे इत्यादी गोष्टी कळायच्याच. पण त्याहीशिवाय डोळ्यात भरायचे ते, उजवीकडचे लॉन.. तिथे जायला चक्क चार-सहा पायर्‍या होत्या.. आणि उंचावर लॉन, कडेनी छोटी फुलझाडं आणि सगळ्यात हाईट म्हणजे भलं थोरलं बकुळीचे झाड (खाली बाय डिफॉल्ट सडा!)!! मला ती जागा इतकी आवडली.. 
मला एकंदरीतच ते सगळंच खूप आवडलं होते.. तिथे कॅरम खेळायला क्लब होता (म्हणजे क्लब मधे कॅरम होता!) 
आणि वरताण, लायब्ररी!! धमाल !
मग एके दिवशी पुस्तके आणली..
वेळ : जेवण झाल्यावर दुपारपासून संध्याकाळी फिरायला जाईपर्यंत,
जागा : बकुळीच्या झाडाखाली सावलीत! :)
पुस्तक : श्रीमान योगी !
मला वाटतं ३ की ४ दिवसात मी ते पुस्तक खतम केलं!जी भारावून गेले होते, झपाटले गेले होते त्याला तोड नाही..तेव्हापासून माझे पुस्तक वाचन जोर्रात चालू झाले.. :)
पुस्तकं, विशेषतः ऐतिहासिक पुस्तकं दिसली कि मला हेच सगळं आठवते ! Its something close to my heart, just thought of sharing this with you! :) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

'मेरू'