लॉंग ड्राईव्ह.. !
काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!! असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा झाल्यावर उठलो.. घरी जावसं वाटेचना.. निघालो लॉंग ड्राईव्हला.. लॉंग ड्राईव्ह.. ! आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी प्रकार! तशी मला फिरायची आवड आहेच. पण नवर्याला फिरायचे वेड आहे! आणि त्यासाठी लागणारे कष्ट उपसायची तयारी! कुठल्याही वेडयावाकड्या रस्त्यातून, कुठल्याही अडनिड्या वेळी तासन तास ड्राईव्हींग करायची त्याची तयारी असते, म्हणूनच आम्ही इतके फिरू शकतो.. कारण माझ्या हातात जर व्हील असते, तर मी कधीच अशा रस्त्यांना लागले नसते! काहीही कारण नसताना, विकेंड नसताना, केवळ हुक्की आली म्हणून ड्राईव्हला बाहेर पडणे आणि २-३ तासांनी परत येणे हे नेहेमीचेच.. नशीबाने राहतोय सुद्धा सुंदर जागी.. जिथून समुद्र १० मिनिटांवर, डोंगररांगा १५ मिन्टांवर...