आवडलेले काही - कवितांचा खोखो..

खूप गडबडीत असल्याने खो ला उत्तर द्यायला उशीरच झाला खरा..
संवेदने खो चालू केल्याबद्द्ल आणि राजने मला खो दिल्याबद्द्ल धन्यवाद!

सगळ्यांनीच उत्तमोत्तम कवीता लिहील्या आहेत. त्यामुळे काय लिहावं हा प्रश्नच होता.. कारण मी कवीतांमधे खूप रमणारी मुलगी नाहीए. आवडत नाहीत असं नाही, परंतू कवीता समजून घेऊन वाचण्याचा पेशन्स नाहीए माझ्यात.. त्यामुळे फार कविता वाचल्याही नाहीत,ज्या वाचल्या त्या सगळ्याच लक्षात नाहीत आता...

असो.. तर मी इथे १ कवीता देणार आहे माझ्या आईची.. माझी आई उत्तम कविता करते,वेळ-प्रसंगानुसार, समयोचित कवीता करणं हा आईचा हातखंडा प्रकार आहे..
या कविता जगाच्या दृष्टीने साध्याच असतील, वृत्तं,यमक,आणि अजुन काय काय सांभाळलं गेलं असेलच असं नाही. परंतू माझ्या दृष्टीने या कवीता फार मोलाच्या आहेत..

१) "सामना"

( ही कवीता, आईने ,तिचे वडील हॉस्पिटलमधे मृत्युशी झुंझत असताना लिहीली आहे.. माझे आजोबा, एक उत्तम शिक्षक होते, क्रिकेटचे प्रचंड वेड.. रणजी सामन्यांमधे आजोबांनी अंपायरींग देखील केले होते.. म्हणून ही कवीता "सामना"! इतकी आतून आली आहे ती, की ही कविता वाचताना मला हमखास माझे आजोबा आठवतात, त्यांना हॉस्पिटलमधे ठेवले होते ते दिवस.. सॅड आहे, ’आवडती’ कविता नाही म्हणवत, पण तरी माझ्यासाठी मोलाची आहे म्हणून इथे लिहीते..)

आयुष्याच्या अंगणात आज एक सामना सुरू आहे
शिवाशिवीचा खेळ अगदी रंगात आला आहे
शरीर आणि आत्म्याच्या ह्या डावात,
आत्मा बाहेर येण्यासाठी तडफडतोय,
तर शरीर त्याला कोंडून ठेवण्यासाठी धडपडतेय.
आजतरी शरीराची धडपड कारणी लागली आहे,
एक सामना आज अगदी रंगात आला आहे..
कबड्डीच्या या सामन्यात -
आत्मा पार्टी सोडून प्रतिस्पर्ध्याला,
आऊट करू पाहतो आहे
पण दम गेल्यावर मात्र
स्वारी परत पार्टीत येऊन बसली आहे.
आयुष्याची दोरी अजुन बळकट आहे
आम्ही सारे प्रेक्षक शरीराच्या बाजूने,
चिअरअप, किप ईट अप म्हणत बसलो आहोत ...
टगऑफवॉरच्या या खेळात शरीराचा विजय झाला आहे..
आत्मा बिचारा गुपचुप निपचित होऊन पडला आहे..
अंपायरच्या भुमिकेत देव सतत उभा आहे..
हात वर करावा की नाही
याचा अजुन निर्णाय होत नाहीए..
कोणाच्याच अपीलला तो दाद देत नाही,
तशी पार्सलिटी त्याला मुळीच खपत नाही..!
पण असे अनिर्णीत सामने किती दिवस चालणार,
एक ना एक दिवस आत्मा मुक्त होणार..
हे सगळं माहीत असूनसुद्धा,
आसवांची तळी अजुन आटत नाहीत..
पायांची लटलट अजुन थांबत नाही,
मायेचा पाश अजुन सुटत नाही
विचारांनी सुद्धा मन थरथरू लागतंय,
मृत्युला या जगातून तडीपार करावसं वाटतंय़!!


२) ह्म्म.. दुसरी कविता संदीप खरेची.. खूप साधं ,सरळ, सोपं लिहीतो तो.. मला असंच लेखन आवडतं, गद्य व पद्यही.. त्यामुळे दुसर्‍या कवितेचा मान त्याला! तशा मला त्याच्या सगळ्याच कविता आवडतात.. एक सिलेक्ट करायची म्हणून ही..

कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी... माझ्यानंतर

अवचित कधी सामोरे यावे
अन श्वासांनी थांबुन जावे
परस्परांना त्रास तरीही-
.. परस्परांविण ना गत्यंतर

मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलांस माझा
लावून जाते हळूच अत्तर

भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतुकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे 'तुझेपण'
तुझ्याबरोबर माझे 'मीपण'
तुला तोलुनी धरतो मी अन
तू ही मजला सावर सावर

मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुस्मट होता
झरते तिकडे पाणी टपटप
अन इकडे ही शाई झरझर
...

माझा खो : किशोर आणि पिडाकाका(मनतरंग)

टिप्पण्या

Kishor म्हणाले…
Pahili kabita khup Sundar ahe. Kho mhanje nakki kay karaycha he kalla anhi pan :) mhanje mi kahitari lihun dusrya ekala kho dyaycha ka?
Raj म्हणाले…
दोन्ही कविता आवडल्या. छान चॉइस आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!