'मेरू'

काल नेटफ्लिक्सवर 'मेरू' ही डॉक्युमेंटरी पाहिली. अफलातून!! हिमालयातील मेरू पर्वत हे आपण ऐकले आहे.(कुठे ते सांगा बुवा कोणीतरी. मला जाम रेफरन्स आठवत नाहीये. ओह! ते मुंग्यांनी मेरू पर्वत उचलला असं काहीतरी डायलॉग की म्हण आहे ना/का??) बर असो.. तर ते मेरू पीक हे अभेद्य होते. त्याचे दुसरे नाव आहे 'शार्क्स फिन'!! कोणीही मानव तिथे वरपर्यंत जाऊ शकला नव्हता. प्रयत्न खूप झाले. पण अयशस्वी. Mugs Stump ह्या नोटेड रॉक क्लाईंबर व माउंटेनिअरने प्रयत्न केले होते. हा मग्स होता Conrad Anker चा मेंटर. पुढे मग्स कुठल्यातरी मोहिमेत मरण पावला मात्र कोन्राडच्या डोक्यात हे मेरूवेड घोळतच राहिले. त्याने त्याचा बर्‍याच वर्षांचा सहकारी Jimmy Chin आणि दुसरा एक नवखा Renan Ozturk ह्या दोघांबरोबर मेरूची मोहिम आखली. रेनान तुलनेने नवखा, हिमालयाचा तेव्हाढा अनुभव नसलेला होता. जिमि मात्र एकदम प्रो. जिमी व कोन्राड बर्याचदा एव्हरेस्ट सर करून आले होते वगैरे. अशी टीम निघाली.२०,०००+ फीट उंचीचे शिखर! सरळ जवळपास जमिनीला काटकोनात असलेली कडा! त्या भिंतीवर पॅरलल, हवेत तंबू उभारून झोपायचे वगैरे. मोहिम चांगली चालू होती मात्र वादळ सुरू झाले आणि ४ दिवस ते सुरूच राहिले. ह्या लोकांचा अन्नसाठा संपत आला तसेच हवा खराब. आणि मग वर जाण्यात काही अर्थ नसल्याने ते मागे फिरले. हो गोष्ट २००८ची. सगळे परत फिरले. आपापल्या आयुष्याला परत लागले. मात्र कोन्राडला आपला मेंटर मग्सचे स्वप्न पुरे करायचेच होते. परत एकदा जावे असं ठरू लागले. आणि रेनानला स्किईंग करताना भयानक अपघात झाला! कवटीचा त्रिकोणी तुकडा निघाला, अर्ध्या मेंदूला रक्तप्रवाह बंद, कदाचित हा परत कधी चालूच शकणार नाही अशी शक्यता! आणि मोहिम आलेली ५ महिन्यांवर! त्यानंतर चारच दिवसात जिमी स्किईंग करताना एका प्रचंड मोठ्या Avalanche मध्ये सापडला आणि अक्षरशः चमत्कार होऊन पूर्णपणे हातीपायी धड वाचला. वाचला खरा, मात्र त्याला विचारात पाडले त्या अपघाताने. आपण जे करतोय ते केले पाहिजे का, काय करावे असे बरेच प्रश्न पडले. मात्र पट्टीच्या माउंटेनिअरनुसार त्याने परत तिथेच जायचा निर्णय घेतला. इकडे रेनान जीवघेण्या अपघातातून रिकवर होत होता. एकच इर्ष्या! मेरूवर जायचे! प्रचंड कष्ट करून चालू लागला, व्यायाम सुरू केला, फिजिकल स्ट्रेन्थ कमावली. नुसतं फिजिकलच नव्हे तर त्यात मानसिक तयारी देखील खूप लागली असणार. अर्ध्या मेंदूला रक्तप्रवाह नाही, नुकत्याच ब्रोकन स्कल व फ्रॅक्चर्ड स्पाईन ह्या जीवघेण्या सिचुएशनमधून डायरेक्ट मेरूला जायचा विचार करणे. त्यात मेंदूला रक्त न पुरून स्ट्रोक येऊ शकतो, तो मरू शकतो हे सगळं ध्यानात घेऊनही तिथे जायचेच हे ठरवणे!! कुठून येते एव्हढे डेडीकेशन? इकडे कोन्राडची अवस्था अजून वाईट. आपले स्वप्न आहे खरे. पण त्यासाठी ह्या दोघा पोरांच्या जीवाशी खेळावे का? आपण रिस्पॉन्सिबल असू का काही झाले तर? (दोन सहकार्‍यांचे मृत्यू मोहिमेत अनुभवल्याने कोन्राडला अ‍ॅन्झायटी येणे साहजिक होते) मात्र हो नाही करत शेवटी निघाले त्रिकुट. २०११ला. रेनानच्या अपघातानंतर केवळ ५ महिन्यात! मजल दरमजल करत जाताना कधी हवेतील तंबू तुटला तर कधी रेनानला मिनि स्ट्रोक येऊन तो गिबरीश बोलायला लागला पण त्रिकुटाने मेरू पर्वत सर केलाच! मग्सचे स्वप्न पुरे झाले. कोन्राड-जिमीची पर्वतारोहण दशकपूर्ती झाली ती अशी! आजवर एकही मानव जिथे पोचू शकला नाही अशा जागी हे त्रिकुट! त्यात एक सोडून दोन जण अशी ज्यांनी नुकतंच मृत्यूला पिक-बू केले आहे! असे हे त्रिकुट मेरूवर पोचले! काय इन्स्पिरेशनल होती ही डॉक्युमेंटरी! मी क्षणोक्षणी अवाक होत होते. इथे मला लिव्हिंग रूममधून गराजमध्ये जाऊन ट्रेडमिलवर ३ माईल्स पळता येत नाहीत आणि हा रेनान फुटलेल्या कवटीला सुधारून, अर्धवट रक्तप्रवाह असलेला मेंदू घेऊन, मेरू वर जातो! जिमीने जी स्नोस्लाईड अनुभवली त्यानंतर त्याने पूर्ण काळ घरात गडप होऊन बसले असते तरी ते जस्टीफायेबल होते! इतके सहकारी मोहिमेवर मरत असताना पाहात असतानाही कोन्राडचे परत परत चॅलेंजला जाऊन भिडणे प्रचंड इन्स्पायरिंग होते. आणि हो, रात्रीच्यावेळचा हिमालय, तसेच ढगात बुडालेला हिमालय असे अत्यंत प्रेक्षणिय तुकडे आहेत ह्यात. माझा विश्वासच बसत नाही तिथली रात्र किती सुंदर असेल! तार्‍यात बुडालेली! फार सुंदर डॉक्युमेंटरी!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Archives