३१ जुलै, २००९

लॉंग ड्राईव्ह.. !

काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!!
असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा झाल्यावर उठलो.. घरी जावसं वाटेचना.. निघालो लॉंग ड्राईव्हला..

लॉंग ड्राईव्ह.. ! आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंददायी प्रकार! तशी मला फिरायची आवड आहेच. पण नवर्‍याला फिरायचे वेड आहे! आणि त्यासाठी लागणारे कष्ट उपसायची तयारी! कुठल्याही वेडयावाकड्या रस्त्यातून, कुठल्याही अडनिड्या वेळी तासन तास ड्राईव्हींग करायची त्याची तयारी असते, म्हणूनच आम्ही इतके फिरू शकतो.. कारण माझ्या हातात जर व्हील असते, तर मी कधीच अशा रस्त्यांना लागले नसते!
काहीही कारण नसताना, विकेंड नसताना, केवळ हुक्की आली म्हणून ड्राईव्हला बाहेर पडणे आणि २-३ तासांनी परत येणे हे नेहेमीचेच.. नशीबाने राहतोय सुद्धा सुंदर जागी.. जिथून समुद्र १० मिनिटांवर, डोंगररांगा १५ मिन्टांवर आहेत..

आमच्या नेहेमीच्या जागा म्हणजे मालिबू कॅन्यन्स, सॅन्ता बार्बरा..

मालिबू कॅन्यन्स.. मालिबू या नावात किती ग्लॅमर आहे!

IMG_0905
वेगवेगळ्या हॉलिवूडपटांमधून याचे दर्शन दिसते..सगळ्या स्टार्सची करमणूकीसाठी पडीक व्हायची जागा ही.. त्याच बड्या स्टार्सची व्हेकेशन होम्स देखील येथेच! तो समुद्र, ती समुद्राला अगदी लागून असणारी देखणी घरं, वळणावळणाचा रस्ता, डावीकडच्या डोंगरावर पसरलेली श्रीमंत लोकांची घरं.. या घरांवरून आठवले.. आयर्न मॅन या चित्रपटात त्या आयर्न मॅनचे घर याच भागात दाखवले आहे.. शूटींगही इथलेच.. आम्ही त्याचे ते घर दिसते का पाहय्ला कितीदा फिरलो इथून! तो सेट असणारे हे माहीत असून सुद्धा! कारण खरंच तसे भव्यदिव्य घर इथे प्रत्यक्षात असूही शकते.. इथून जरा पुढे गेले की लागतात मालिबू कॅन्यन्स.. लांबच्यालांब पसरलेल्या डोंगररांगा.. पण सगळे डोंगर अगदी जवळ जवळ असतात.. त्यामुळे दरीतून थोडं चालून गेलो तर शेजारच्या डोंगराकडे जाऊ, अशी डोंगरांची भाऊगर्दी!
IMG_3699

दिवसा जितके सुंदर दिसतात, तितकेच रात्री भयाण! उन्हाळ्यातल्या रात्री नुसतेच काळे कभिन्न दिसतात.. मात्र हिवाळ्यात रात्री गेलात की दिसतात काळे डोंगर मात्र धुक्यात बुडालेले.. मी तिथे हिवाळ्यात जायला खरंच घाबरते! एक सही आहे तिथे.. याच डोंगर रांगांमधे आपली भारतीय दक्षिणी थाटातील देवळं वसली आहेत.. काळेकुट्ट डोंगर त्यात पांढरी शुभ्र देवळे! मस्त वाटतं..

आमच्या इथून सॅन्ता बार्बरा ही सुंदर सिटी खरंतर तासाच्या अंतरावर.. पण आम्ही कधीही उठून तिथे जातो.. लांब रस्ता आहे.. तळं,जंगलही लागते अधून मधून.. समुद्र .. तो काही आमची पाठ किंवा साथ सोडतच नाही! जिथे जाऊ तिथे तू माझा सांगाती.. वेगळवेगळया वेळचे ते दर्याचे रूप पाहणे म्हणजे काय आनंद असतो. गाणी असतातच गाडीत.. सॅन्ता बार्बराला जाताना उजवीकडे डोंगररांगा आणि डावीकडे अखंड समुद्र.. आणि नेमानी वाटेत भेटलेली ती डोंगरातली गूढ पेटती मशाल! सुरवातीला वाटायचे आग लागली आहे... इथे आग, वणवा नेहेमीचाच.. त्याचं काही वाटेनासं झालंय आता.. पण इतकुशी ती आग नेहेमीच कशी लागलेली असेल? मग तिला मशाल बनवून टाकले आहे.. एखादे हॉटेल वगैरे असेल डोंगरात.. काही कल्पना नाही! मात्र अंधार गुडूप झाला असताना तिथे ती मशाल दिसणं, हे जितकं गूढ आहे तितकंच छानही आहे!
सॅन्ता बार्बराला जाताना जस्ट आधी एक चौक आहे.. तिथे हारीने उभी असलेली झाडांची गर्दी दिसते.. लांबचा कुठलातरी पूल दिसतो.. एका साईडने सर्फलायनर ही ट्रेन जात असते .. तर झाडांच्या गर्दीत मधूनच डोकावते, त्या चित्राला पूर्ण स्वरूप देणारे सुंदरसे तळे! मला ती जागा फार आवडते!
सॅन्ता बार्बरा मधे आलो की मग मात्र रूप बदलते.. ही सिटी अगदीच वेगळी..वेगवेगळ्या हॉलिवूडपटांमधून आणि जिच्या नावावरच टीव्ही सिरिअल निघाली ती ही सिटी म्हणजे टूरिस्टांची पंढरी.. त्यामुळे सतत कोणीना कोणीतरी दिसतेच.. अखंड जाग असते या शहराला! दोन्ही साईडनी पामच्या रांगा.. डावीकडे समुद्र, त्याच्यावरचा तो पाण्यात घुसलेला , एकदा जळून परत नव्याने उभा राहीलेला सॅन्ता बार्बरा पीअर.. थोडं सरळ गेलं की हार्बर, एक मोठं मैदान जिथे रात्रीचे सुद्धा मोठाले दिवे लावून सामने चाललेले असतात, टुरिस्ट लोकांच्यासाठी हॉटेल्स, इन्स.. ते सोडून पुढे गेलं की गावातील सुंदर घरं सुरू होतात! इतका शांत एरिआ आहे हा.. की मी नवर्‍याला लगेच गाडी वळवायला सांगते.. शांतता जितकी सुंदर तितकीच भीतीदायकही वाटते.. मग आम्ही स्टेट स्ट्रीटला जातो.. इथला लक्ष्मी रोड म्हणाना ? अखंड गजबजलेला.. फॉर अ चेंज गाड्यांची नसून माणसांची गर्दी असलेला.. रात्रीच्या वेळी गेलात तर सगळी शॉपिंगची दुकानं बंद दिसतील, मात्र सगळी रेस्टॉरंट्स आणि डिस्क्स ओपन दिसतील.. ते नीळे जांभळे लाल लाईट्स, धुंद म्युझिक.. गाडीतून जाताना ओझरते कानावर पडते पण आपल्यालाही ती धूंदी जाणवते..
मग आम्ही परत येतो.. जाताना परत ती मशाल दिसते.. आता डावीकडे..

काल असंच विचार करत होतो या दोन्ही पैकी कुठे जावं.. नवर्‍याने गाडी घेतली पॅसिफीक वनला! हा, पॅसिफीक कोस्टल हायवे..
DSC00132
सॅन फ्रान्सिस्को पासून लॉस एंजिलीस पर्यंत टोटल अंतर ३५० मैल..नेहेमीच्या १०१ ने जा ये करतात लोकं.. पण हा पॅसिफीक कोस्ट हायवे कोणी घ्यायचे धाडस करत नाही.. कारण त्यात आहे, सतत २००-२२५ मैलाचा घाटातला वळणावळणाचा रस्ता, ज्यात एका साईडला डोंगर, दुसरीकडे समुद्र.. हो २००+ माईल्स हा समुद्र सतत दिसतो!! समुद्र आवडणार्‍याला पर्वणी! अर्थात पॅसिफीक वन हा त्याहून खूप मोठा रस्ता!
आम्ही एकदा आलो इथून.. रात्रीचा प्रवास.. मी किती घाबरले त्याला तोड नव्हती.. त्यातून नवर्‍यानी गाडी त्यात डोंगराच्या माथ्यावर असलेल्या हॉटेलमधे थांबवून जेवण करण्याचा प्लॅन आखला..! त्या हॉटेलच्या समोर हा पॅसिफीक वन, त्याच्या समोर हा भला डोंगर आणि मागे काही नाही, फक्त दरी आणि खाली समूद्र..
हे ते Hotel Lucia on Pacific One !काल आमच्या गावातून जाणारा तो पॅसिफीक वन पकडला.. आणि आलो घाटात.. ट्रॅफीक अगदीच कमी.. जे फार क्वचित होते.. समुद्र पाहून बोलती बंद! अतिशय शांत समुद्र.. काय थोड्या लाटा येतील तेव्हढ्याच..त्याच्यात अजुन भर म्हणून भरपूर धुके! शांत काळे पाणी.. त्यावरचे हलकेच उठणारे तरंग, बरोब्बर वर दिसणारा अर्धाच चंद्र! पौर्णिमेच्या चंद्राची मजाच और असते हे ऐकले/पाहीले होते.. पण हा असा अर्धा कापलेला चंद्रही इतका देखणा आणि तेजस्वी दिसतो हे पाहीले नव्हते.. त्याच्या प्रकाशात दिसेल इतकाच समुद्र आम्हाला दिसत होता.. आणि त्या समुद्राच्या लाटेबरोबर चंद्राचे प्रतिबिंबही धावत आमच्याकडे येत होते.. किती सुंदर दिसावं ते दृश्य? शब्द कमी पडतात! अगदीच प्रयत्न करून पाहीला.. बेकार झालाय.. पण ते असं वाटत होतं, की एक अखंड मोठा गुळगुळीत पृष्ठभागाचा चकचकीत काळा कातळ पसरलाय आणि त्यावर पारा सांडलाय.. शब्दबंबाळ आहे हे, पण असंच काहीतरी सुंदर होते ते..

तिथे गाडी लावून तो नजारा बघत बसलो.. डोळ्यात साठवत बसलो.. समुद्राची गाज कानात रूंजी घालत होती.. एक क्षण वाटले कॅमेरा कुठाय माझा? पण लगेच वाटले नाहीये तेच बरं..अशी दृश्यं डोळ्यात कॅप्चर करायची.. कॅमेर्‍याच्या फिल्म वर घेण्याच्या नादात आपण आपल्या मनाच्या फिल्मवर ती प्रतिमा घेत नाही.. नाही तेच बरं.. आणि खरंच दृशं कोरलं गेलं मनात.. कधीही विसरणार नाही मी कालची रात्र! कालचा लॉंग ड्राईव्ह..

परत येताना त्याच भयाण मालिबू कॅन्यन्स मधून आलो.. पण आज ते भयाण नाही वाटलं.. डोक्यात विचार समुद्राचेच.. आपण किती भाग्यवान आहोत याचा विचार सारखा डोक्यात येत होता.. इतकं सुंदर दृश्य आपण पाहू शकतो.. ते ही मध्यरात्री! आणि मनात असुरक्षिततेची भावना न येता पूर्णपणे रममाण होता येतं त्या निसर्गात.. ! फार भाग्यवान आहे मी! पहीली गोष्ट: मला असा नवरा मिळाला जो मला अशी ऍडव्हेन्चरस गोष्टी करायला मदत करतो, उद्युक्त करतो, दुसरी गोष्ट: मी अमेरिकेत अशा ठिकाणी आहे जिथे मला भरभरून निसर्ग दिसतोय.. आणि तिसरी गोष्ट: अमेरिकेत आहे.. जिथे रहीवाशांच्या सुरक्षिततेची काळजी नेहेमीच घेतली जाते, कुठल्याही क्षणी आपण बाहेर पडून हे सगळं अनुभवू शकतो!.. I am the luckiest person in the world ! I am so happy..! :)

२० जुलै, २००९

ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:..
"अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा
"हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :("
"ह्म्म.."
"ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...."
"असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! ;) "
"हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त दिवस होते.. पण ते भारतात परतल्यापासून जास्तच वाटतंय मला असं.. :( "

"ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !! मला आत्ताच्या क्षणाला काहीही आवडत नाहीये इथलं.. एकतर आपल्या गावात आपली लोकं कमी.. त्यातून अमेरिकन्स जास्त.. त्यान्ना हाय हॅलो सोडून काही बोलता येतं की नाही कोण जाणे! मला ना असं कोणीतरी पाहीजे.. अपॉइन्टमेन्ट, फॉर्मॅलिटी सगळं सोडून फोन न करता छान पैकी आरामात घरी येऊन कॉफी पीत गप्पा हाणणारी मैत्रीण हवीय़! श्या किती आम्ही मारायचो गप्पा अशा.. मिथु,मनी.. sigh.. ... इथे आहेत ना लोकं, मैत्रीणी.. पण किती ते अंतर? अमेरिकेच्या एका टोकावरून दुसरीकडे जायचे म्हटले तरी विमानाने ८-१० तास लागतात!! सगळंच अवघड! साधी कोथिंबीर आणायला गाडी काढून १५-२० मैल तरी गाडी हाकावीच लागते!! "
" घरं पण कसली पुठ्ठ्याची! मला इथल्या भिंती पण आवडत नाहीत.. पांढरे पुठ्ठे सगळे! रात्री अंगावर येतात अंधारात! सुरवातीला आठवते ना कसे झाले.. २-३ आठवडे नुसती वाईट स्वप्नं मला! म्हणजे आधीच तो वाईट्ट जेटलॅग लागला होता.. वेड्यासारखी कधीही झोपायचे.. रात्री टक्क जागी.. कधीतरी झोप लागली तर वाईट स्वप्नांची रांग.. कधी मी पडतीय, कधी कोणीतरी माझा पाठलाग करतंय, कधी कोणी मारतंय.. अर्रे काय्ये हे ?? :(( "
"अगं नवीन जागा.. त्यातून तू कधी पुणे सोडून राहीली नाहीयेस.. येणारच ना त्या अशा (भितीदायक) जुन्या आठवणी..!! " (माझा नवरा पुण्याचा नाही, त्यामुळे तो पुण्यावरून टॉन्ट्स मारणे सोडत नाही!! )

"गप हा.. पुण्याला नावं नकोयेत.. मी आधीच इतकी मिस करतीय.. आणी तू असं बोलतोस.. काही वाटतं का तुला?? तुझी गरीब बिचारी बायको इतकी वैतागलीय.. आणि तुला जोक्स सुचतायत.. व्हेरी फन्नि!!! :(( ते काही नाही.. तू काहीतरी कर.. कळलं का? मला पुण्याला जायचेय..सगळ्या मैत्रिणींना भेटायचेय.. पुण्याला भेटायचेय माझ्या! आई बाबांबरोबर राहायचंय.. आईला स्वयपाक करून तिच्या आवडीचे खायला करून द्यायचंय(एकदातरी!! :D ), त्यांच्याबरोबर कॅरम,रमी खेळायचीय! खूप काही! तेही आत्ताच्या आत्ता !!?? "
"आय नो, आय नो... डोन्ट वरी.. जाशील तू लवकरच.. ओके? नॉऊ चिअर अप! काय कंटाळा कंटाळा करतीयस.. विकेंडला कुठे जायचे ते कर बरं प्लॅन.. मी काही पाहणार नाही.. लोकेशन, रस्ते, हॉटेल्स सगळं ठरव.. जाईल वेळ जरा.. तसंही तू काही सोडणार नाहीस प्लॅनिंग नीट करायला.. नंतर ऑर्कुटवर फोटो टाकून शायनिंग मारायचे असते ना! हेहे"
"हो म्हणजे काय! :)) अरे ते शायनिंग मारणे नसते रे ! मी काय करतीय सद्ध्या, कुठे भटकंती, किती खादाडी केली ते सगळं एका क्लीक मधे कळतं ना माझ्या मित्र-मैत्रिणी,घरच्यांना.. ते सगळं शेअर करणं हा उदात्त(!) हेतू असतो बरका! लोल.. :) "
"ह्म्म नशीब हसलीस.. आता जा काहीतरी मस्त खायला कर! वरणफळं नाहीतर साबुदाण्याची खिचडी कर! "
"ह्म्म, आला मूळपदावर! सा.खि. काय अरे.. जमेल का अशी इन्स्टंट! करते काहीतरी !! मलाही भूक लागली वैताग करून!"
-------------------------------------------------------------------------------------------
नेहेमीचे डायलॉग्स हे..
( घरची मंडळी : घाबरू नका! टेन्शन घेऊ नका! मी एकदम मजेत आहे! :) )

सगळे तोंडावर आले नसतील संवाद.. पण मनात सतत वाजत असतात..
किती मिस करते मी इंडिया, पुणे, सगळंच,सारखंच..
वरचा संवाद वाचून असे वाटेल की मी अगदीच दिवसभर फ्रस्ट्रेट होऊन बसलेली असीन.. तसं काही नाही! मस्त आराम फर्मावतीय़.. भरपूर हिंडतीय.. खूप नवीन पदार्थ करायला शिकतीय, ते खात सुद्धा आहे! इथेही मैत्रिणींशी फोनवर का होईना गप्पा हाणतीय.. चॅट तर काय असतंच.. इथेही मंडळाचे कार्यक्रम असतात, भरपूर मराठी पब्लिक साधारण ४०-५० मैलांवर असतेच! बरेच नातेवाईक राहतात जवळच..

सगळं बेस्ट आहे हो! पण म्हणून इंडीयाची आठवण येणारच रोज! नाही जाऊ शकत मी हवं तेव्हा, मनात येइल तेव्हा.. अंतर,नोकरीतून सुट्ट्या,व्हीजाच्या कटकटी असतातच, त्या सगळ्या जंजाळातून जाणे म्हणजे कुठे सोप्पंय!

आत्ता लिहीता लिहीता अजुन एक जाणवलं.. भारताबद्दल आपल्या मायभूबद्दल इतकं, इतकं आतून वाटत असतं सारखं.. जीव तीळ तीळ तुटतो कधी कधी! आई कधीतरी सांगते शक्य तितक्या नॉर्मल आवाजात, की चिऊड्या आत्ताच तुझी इतकी आठवण आली, असला सही पाऊस पडातोय़!.... अशा परिस्थितीत धड उठून जाताही येत नाही.. समजूत काढूनही उपयोग नसतो, आणि काय काढणार? कसंनुसं हसून विषय बदलायचा अन काय!
असं आणि इतकं वाटत असताना जेव्हा कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही.. आजकाल नेटने जग फार जवळ आलंय.. लिखित मिडिअम असल्यामुळे कोणी काहीही बोलले तरी फारसा फरक नाहीच पड्त! पडून घेऊ नये! पण मग असं पदोपदी दिसत असेल तर आपण नक्की काय करावं?(अगदी कॉमन उदाहरण घ्या, इसकाळमधे येणारे वाचकांच्या कमेंट्स!! ) आमची काही आकांक्षा आहे, एक ठराविक ध्येय आहे आयुष्यात, काही नवीन गोष्टी साध्य करायच्या, नवनवे प्रदेश पाहायला मिळ्तात, काही शिकायचे असते.. हे सर्वं चूकच का?? आपलं, आपल्या आई बाबांचे, कुटुंबाचे आयुष्य जमेल तितके सोपे करायचे.. या विचाराने आम्ही इथे येतो.. त्यांच्याबद्दल प्रेम जाऊदे, पण द्वेष का वाटावा इतका? इतका.. की त्या लोकांनी भारताबद्दल आपुलकीनी बोलायचेही नाही, काही सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच! आमचा देश आम्ही पाहून घेऊ.... अरे?? आमचा देश?? तो आपला देश आहे ना? देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्‍याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला? :( इट हर्ट्स.. पण जाऊदे.. जशी परदेशात आहे म्हणून बळंचच भारावून जाणारी लोकं असतात तस्साच पण उलटा प्रकार!

आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो, छ. शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून स्फुरण चढते, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जमेल तसे कार्यक्रम होतात इथे, कार्यक्रमापेक्षाही ती देशभक्तीची भावना आमच्याही मनात तेव्हढीच असते, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझ्याच काळजाची जखम असल्यासारखे सैरभैर झाले होते मन... अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!! आम्ही भारतीयच आहोत शेवटी... जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी! आणि मायभूला स्वत:च्या ’माय’ इतकंच मिस करत राहणार.. म्हणून तर हे सगळं मराठी साईट्स शोधणे, मराठीतून ब्लॉग लिहीणे, पुस्तकं शोधणे वगैरे करत असतो आपण.. जमेल तसं भारतीय,महाराष्ट्रीय लोकं शोधून गणगोत जमवतोच ना आपण? इंडियन रेस्टॉरंट दिसलं की पावलं वळतातच ना तिथे? शेवटी आयुष्याची कमीत कमी २४-२५ वर्षं जिथे काढली ती पुसून थोडीच जाणारेत?? कसं शक्य आहे..!
------------------------------------------------------------------------------------------------
हे अन असं सारखं येतच असतं डोक्यात.. बर्‍याच दिवसांपासून काहीतरी लिहायचे होते असे.. अर्थात मनातले विचार परफेक्ट नक्कीच उतरले नाहीयेत.. नाहीतर मी प्रथितयश लेखिका नसते का झाले! :) नेहेमीप्रमाणेच मनात आले तसे उतरवले..
आवडले तर नक्की कळवा.. नाही आवडले तरी कळवा चालेल! :)

१३ जुलै, २००९

गेले काही महीने मस्त गेले.. नवर्‍याने बरीच पुस्तकं आणली भारतातून.. ती वाचण्यात मस्त वेळ गेला. मुक्काम-गौरी देशपांडे, इजिप्तायन,मेक्सिकोपर्व - डॉ. मीना प्रभु, माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग, हसरे दुख्ख - भा.द. खेर (मागे एकदा चार्ली चॅप्लिनचे पुस्तक वाचल्यावर पोस्ट लिहीली होती, तेव्हा खूप जणांनी याचे नाव घेतले होते.. आवडले..पण बेस्ट नाही वाटले! अनुवाद आहे कळते,काही भाग इतका विनोदी पद्धतीने उरकला आहे! असो..) त्यानंतर वाचले वपुंचे एक पुस्तक-नाही आवडले विशेष, मला त्यांचे महोत्सव आवडलंय तितकं बाकीचे नाही आवडणार बहुतेक.. पुलंची ऑल टाईम फेव पुस्तकं वाचून झाली, आता गाडी वळाली पानिपत ! 
ऐतिहासिक पुस्तकं/कादंबर्‍या वाचण्याविषयी माझं जरा त्रांगडं झालंय ! मी सिरीअसली वाचायची सुरवात केली ’श्रीमान योगी’ पासून.. अज्जुन आठवतंय मला! बाबा तेव्हा सोलापुरला होते. त्यांच्या ऑफीसच्या गेस्टहाऊस मधे आम्ही राहायचो जेव्हा जायचो तेव्हा.. मला माहीतीय जागांची वर्णनं असं लिखीत स्वरूपात वाचणे फार त्रासदायक आहे! पण मी लिहीणार ! :) मी ते कधीही विसरणार नाही, तरी मला ते परत परत सांगायला, लिहायला आवडते.. :) गेस्ट हाऊस म्हणजे वेगवेगळे मोठ्ठाले बंगले होते.. तसा बंगला मी कधीही पाहीला नाही.. 
उजवीकडच्या कोपर्‍यात मोठं फाटक, त्याच्या समोर गोलाकार पण आडवा पसरलेला बैठा बंगला.. समोर भरपूर झाडं.. फाटकातून शिरतानाच बंगल्याच्या मागची साईड, तिथे लॉन आहे इत्यादी गोष्टी कळायच्याच. पण त्याहीशिवाय डोळ्यात भरायचे ते, उजवीकडचे लॉन.. तिथे जायला चक्क चार-सहा पायर्‍या होत्या.. आणि उंचावर लॉन, कडेनी छोटी फुलझाडं आणि सगळ्यात हाईट म्हणजे भलं थोरलं बकुळीचे झाड (खाली बाय डिफॉल्ट सडा!)!! मला ती जागा इतकी आवडली.. 
मला एकंदरीतच ते सगळंच खूप आवडलं होते.. तिथे कॅरम खेळायला क्लब होता (म्हणजे क्लब मधे कॅरम होता!) 
आणि वरताण, लायब्ररी!! धमाल !
मग एके दिवशी पुस्तके आणली..
वेळ : जेवण झाल्यावर दुपारपासून संध्याकाळी फिरायला जाईपर्यंत,
जागा : बकुळीच्या झाडाखाली सावलीत! :)
पुस्तक : श्रीमान योगी !
मला वाटतं ३ की ४ दिवसात मी ते पुस्तक खतम केलं!जी भारावून गेले होते, झपाटले गेले होते त्याला तोड नाही..तेव्हापासून माझे पुस्तक वाचन जोर्रात चालू झाले.. :)
पुस्तकं, विशेषतः ऐतिहासिक पुस्तकं दिसली कि मला हेच सगळं आठवते ! Its something close to my heart, just thought of sharing this with you! :) 

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...